भारतातून फरार झालेल्या मेहुल चोक्सीला बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या वकिलांनी डोमिनिकामधील कोर्टात धाव घेतली आहे. मेहुल चोक्सीच्या वकिलांकडून हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे. मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी इंडिया टुडेशी बोलताना वृत्ताला दुजोरा दिला आहे.

याचिकेमध्ये वकिलांनी मेहुल चोक्सीचा छळ करण्यात आला असून त्याच्या शरिरावर जखमा असल्याचा दावा केला आहे. तसंच मेहुल चोक्सीचं अँटिग्वा आणि बारबुडामधून येथून अपहरण करण्यात आलं असाही दावा वकिलांनी केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल चोक्सीच्या वकिलांना यावेळी कायदेशीर मदतीसाठी असणाऱ्या घटनात्मक हक्कांकडे लक्ष वेधलं आहे.

“डोमिनिकामध्ये आमच्या वकिलाला फक्त दोन मिनिटांसाठी मेहुल चोक्सीला भेटण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी त्यांनी आपला भयानक अनुभव सांगितला. अँटिग्वा येथील जॉली हार्बर येथून आपलं अपहरण करुन डोमिनिका येथे नेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक लोक यावेळी उपस्थित होते,” असं विजय अग्रवाल यांनी एएनआयला सांगितलं आहे.

मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही फरार?; स्थानिक पोलिसांकडून शोध सुरु

मेहुल चोक्सीचं डोमिनिकामधून थेट भारतात प्रत्यार्पण होऊ शकतं का असं विचारण्यात आलं असता विजय अग्रवाल यांनी भारतीय कायद्याप्रमाणे अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व मिळताच मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकता रद्द केली असल्याचं त्यांनी सांगितला. इमिग्रेशन आणि पासपोर्ट कायद्याप्रमाणे त्याचं फक्त अँगिग्वामध्येच प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं असंही त्यांनी सांगितलं.

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावल्यानंतर भारतातून फरार झाले होते. नीरव मोदी सध्या लंडनमधील जेलमध्ये असून भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान मेहुल चोक्सीने जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळ काढण्याआधी २०१७ मध्ये अँटिग्वा आणि बारबुडा देशांचं नागरिकत्व घेतलं होतं.