पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदी याला स्कॉटलँड यार्डने लंडनमध्ये अटक केली असून नीरव मोदी बँकेत खाते उघडण्यासाठी गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला, अशी माहिती समोर आली आहे. नीरव मोदी बँकेत पोहोचताच एका कर्मचाऱ्याने त्याला ओळखले आणि त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी हमीपत्र (एलओयू) प्राप्त केले आणि परदेशात पीएनबीला हजारो कोटी रुपयांनी गंडवले. एवढेच नव्हेतर त्याने देशात अनेक बनावट कंपन्या तयार केल्या. बनावट संचालक दर्शवून बँकांना लुबाडले होते. हा घोटाळा सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांचा आहे. हा घोटाळा उघड होण्यापूर्वीच नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि त्यांचे कुटुंबीय देशाबाहेर पळाले होते. काही दिवसांपूर्वी लंडनमधील एका इंग्रजी वृत्तपत्राने नीरव मोदीचा शोध घेतला आणि नीरव मोदी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसला. नीरव मोदीने पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले होते.

बुधवारी नीरव मोदी लंडनमधील मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी गेला होता. नीरव मोदी बँकेत पोहोचताच तेथील एका कर्मचाऱ्याने नीरव मोदीला ओळखले आणि त्याने नीरव मोदीबाबतची माहिती पोलिसांना दिली. अवघ्या काही क्षणातच स्कॉटलँड यार्डचे पथक तिथे पोहोचले आणि त्यांनी नीरव मोदीला अटक केली, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. बँकेला गंडवणारा नीरव मोदी शेवटी एका बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळेच तुरुंगात गेला.

नीरव मोदीने त्याच्या वकिलांमार्फत पोलिसांसमोर शरण जाण्याची तयारी दर्शवली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. २५ मार्च रोजी नीरव मोदी वकिलांसोबत पोलिसांसमोर हजर होणार होता, असे सांगितले जाते. मात्र, नीरव मोदीचा हा प्रयत्न फसला आणि शेवटी त्याला तुरुंगाची हवा खावी लागली.

अटकेनंतर ४८ वर्षीय नीरव मोदीने लंडन येथील वेस्टमिन्स्टर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच कर भरल्याचे आणि प्रवासाचे कागदपत्रही सादर केले होते. त्याचे वकील जॉर्ज हेबुर्न स्कॉट यांनी आपल्या अशीलाकडे प्रवासाचे तीन वेगवेगळे परवाने आहेत, असे न्यायालयाला सांगितले. परंतु जिल्हा न्यायाधीश मॅरी मॅलान यांनी जामीन अर्ज नामंजूर केला. तसेच त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील सुनावणी २९ मार्चला होणार असून भारतातून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयचे अधिकारी प्रत्यर्पणाशी संबंधित कागदपत्रे घेऊन पुढील आठवड्यात लंडनला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.