26 October 2020

News Flash

भारताकडे प्रत्यार्पण केल्यास आत्महत्या करेन; नीरव मोदीची धमकी

नीरववर मे २०२० मध्ये खटला चालणार आहे.

पीएनबी बँकेला कोट्यवधींचा चुना लावून पळालेल्या नीरव मोदीची जामीन याचिका न्यायालयानं पुन्हा एकदा फेटाळली. दरम्यान, नीरव मोदीनं न्यायालयासमोर पोकळ धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. जर भारताकडे आपलं प्रत्यार्पण केलं तर आपण आत्महत्या करू अशी धमकी नीरव मोदीनं दिली. आपल्याला तरूंगात अन्य कैद्यांकडून मारहाणदेखील करण्यात आल्याचं त्यानं न्यायालयाला सांगितलं. यानंतरही न्यायालयानं त्याची याचिका फेटाळून लावली.

पंजाब नॅशनल बँकेत सुमारे २ अब्ज डॉलरचा घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात, भारतात प्रत्यार्पणाची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या नीरवला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा अर्बुथनॉट यांच्यापुढे हजर करण्यात आले. नीरव मोदी याने यापूर्वी न्यायालयात २ दशलक्ष पौंडांची हमी सादर करण्याचा प्रस्ताव दिला होता, तो आता दुप्पट केला आहे. तसेच ज्याप्रमाणे संशयित दहशतवाद्यांना नजरकैदेत ठेवले जाते, त्याचप्रमाणे स्वत: नजरकैदेत राहण्याचीही त्याची तयारी आहे, असे त्याच्या वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले. दरम्यान, नीरव मोदीला एप्रिल महिन्यात तसंच गेल्या मंगळवारी तरूंगात मारहाण करण्यात आल्याचंही त्याच्या वकीलानं न्यायालसमोर सांगितलं.

मंगळवारी सकाळी ९ वाजता तुरूंगातील अन्य कैदी नीरव मोदी जवळ आले आणि त्यांनी त्याला मारहाण केली. तसंच त्याला लुटण्याचाही प्रयत्न करण्यात आला. केवळ नीरव मोदीला लक्ष्य केलं गेलं, असं त्याच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितलं. तसंच माध्यमांमध्ये यापुढेही त्याला कोट्यधीश हिरे व्यापारी असं म्हटलं गेलं तर यापुढेही त्याच्यावर हल्ले होतील. तसंच भारतात नि:पक्ष चौकशीही आपल्याला अपेक्षा नसल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं.

नीरववर मे २०२० मध्ये खटला चालणार आहे. त्यावेळी तो न्यायालयात शरण येईल किंवा तो साक्षीदारांवर प्रभाव टाकणार नाही याबाबत आपल्याला खात्री वाटत नाही, असे सांगून न्यायाधीशांनी त्याला जामीन नाकारला. तथापि, गेल्या सुनावणीच्या वेळी नीरव याच्या मानसिक स्थितीबाबत गोपनीय वैद्यकीय अहवालात नमूद केलेली महिती माध्यमांपर्यंत पोहचल्याबाबत नाराजी व्यक्त करून, यापुढे असे घडू नये अशी तंबी त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 7:43 am

Web Title: pnb scam nirav modi london court if extradited to india will suicide after rejecting bail jud 87
Next Stories
1 नीरव मोदीचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला
2 ..मग लोकांना मरू द्यायचे का?
3 ‘एच १ बी’ व्हिसा नाकारण्याच्या प्रमाणात चौपटीने वाढ
Just Now!
X