बेंगळूरु : नागरिकत्व कायदा (सीएए) व नागरिकत्व नोंदणीच्या (एनआरसी) विरोधात कविता सादर करणाऱ्या कवी व प त्रकार अशा दोघांना कनार्टकात अटक करण्यात आली.

गेल्या महिन्यात झालेल्या सरकारी कार्यक्रमात कवीने नागरिकत्व कायदा व नागरिकत्व नोंदणीविरोधात कविता सादर केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून कवी सिराज बसरल्ली यांना अटक करण्यात आली.

जानेवारीत कोप्पल जिल्ह्य़ातील गंगावती शहरात अनेगुंडी उत्सव आयोजित केला होता त्यावेळी बसरल्ली यांनी कविता सादर केली होती. ती कविता नंतर एका ऑनलाइन न्यूज पोर्टलचे संपादक राजबक्षी यांनी समाजमाध्यमातून प्रसारित केली होती. या प्रकरणी दोघांविरोधात कलम ५०५ (सार्वजनिक पातळीवर खोडसाळपणा करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी बिसरल्ली व राजबक्षी हे कोप्पल जिल्ह्य़ातील न्यायालयात शरण आले कारण त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली आहे.

सिराज यांनी कविता सादर केली व राजबक्षी यांनी समाजमाध्यमातून प्रसारित केली,  त्याबाबत भाजप नेत्याने तक्रार दिली होती. त्यानंतर कवी व पत्रकार दोघेही बेपत्ता होते.

मंगळवारी ते न्यायालयात शरण आले. त्यांनी अंतरिम जामीन मागितला असता सरकारी वकिलांनी त्याला विरोध करून पोलीस कोठडी मागितली.

न्यायालयाने या दोघांना बुधवारदुपापर्यंत कोठडी दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, पुरेसे पुरावे आल्याशिवाय आम्ही आणखी कोठडी मागणार नाही. आम्ही त्यांचे मोबाइल जप्त केले असून तपासणी सुरू आहे.