चीनने भारतावर केलेल्या आक्रमणाने तळमळणारे कवी प्रदीप यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. डोक्यात सतत तोच विचार सुरू होता. तशात आपल्या काही कामासाठी ते माहिमला गेले होते. तेथेच एका फूटपाथवर उभे असताना त्यांना काही ओळी ‘दिसू’ लागल्या. तिथेच पडलेल्या सिगारेट पाकिटावर त्यांनी ते शब्द उतरविले आणि ‘ए मेरे वतन के लोगो..’ हे अजरामर गीत जन्मास आले. नवी दिल्लीत हे गीत सादर झाले त्यास उद्या ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने कवी प्रदीप यांच्या कन्या मितुल प्रदीप यांनी जागविलेल्या या गाण्याच्या आठवणी (विशेष पानामध्ये) आणि ‘त्या’ कार्यक्रमाचे साक्षीदार, ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी उभा केलेला त्यावेळचा माहोल..
पन्नास वर्षे झालीत. पण लताचे स्वर आजही माझ्या कानात रुंजी घालत आहेत. चीनविरुद्धच्या पराभवानंतर काहीसे खिन्न झालेल्या भारतीय राज्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमाने उभारी आली. चीनचा पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला होता. भारतीय लष्कर अस्वस्थ होते. पंचशील तत्त्वाचे पुरस्कत्रे असलेल्या पंडित नेहरूंना ‘िहदी-चिनी भाई भाई’चा नारा दिला म्हणून हिणवले जात होते. सामान्य नागरिकांचं माहीत नाही, पण राज्यकत्रे काहीसे धास्तावले होते.
भारत-चीन पराभवानंतरच्या अशाच एका खिन्न संध्याकाळी दिल्लीच्या नॅशनल स्टेडियममध्ये (सध्याचे मेजर ध्यानचंद स्टेडियम) एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवस होता २७ जानेवारी १९६३. कार्यक्रम कसला संगीत संध्याच म्हणा हवं तर. ‘ऐ मेरे वतन के लोगों..’ असंच काहीतरी या कार्यक्रमाचं शीर्षक होतं. कार्यक्रमासाठी पास वितरित केले गेले होते. तिकीटही होतं. माझ्यामुळे राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना माझी पत्नी भारतीही उपस्थित राहत असे. त्या वेळी आम्ही हुमायून रोडवरील बंगल्यात राहत असू. मुलं लहान होती. त्यांना कार्यक्रमात न नेण्याचं आम्ही ठरवलं. इंडिया गेटच्या अगदी समोरच हे नॅशनल स्टेडियम आहे. अलीकडचं माहीत नाही, पण चार ठिकाणांहून त्या काळी स्टेडियममध्ये प्रवेश करता येत असे.
कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांच्यासह झाडून सारे केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मौलाना आझाद उपस्थित असल्याचं मला आजही आठवतंय. नेहरूंच्या अगदीच जवळ बसले होते. वातावरण कुंद होते. ढगाळ दिल्लीच्या थंडीला शोभणारा गारठाही होता. नेहरू नेहमीच्या पोषाखात. बंद गळ्याची शेरवानी. मी त्यांच्या मागे दोन-तीन रांगा सोडून बसलो होतो. नॅशनल स्टेडियम खचाखच भरलं होतं. लता मंगेशकरांनी एकापाठोपाठ देशभक्तिपर गीतं सादर करायला सुरुवात केली. त्या काळी मोठे एलसीडी स्क्रीन वगरे नव्हते. त्यामुळे प्राण कंठात आणून आम्ही सारी गीतं ऐकत होतो. देशभक्तिपर गीतं म्हटली जात होती, पण तरीही चीनच्या पराभवामुळे साचलेलं मळभ दूर होत नव्हतं. अशा वातावरणात लता गाणी म्हणत होती. उत्स्फूर्तपणे लोक दाद देत होते. काही गाण्यांची आवर्जून फर्माईश होत होती. मला वाटतं समारोप जवळ आला होता. ‘कवी प्रदीप इनके शब्द एवं महाराष्ट्र के सी. रामचंद्र के संगीत से सजा हुआ गीत’ असं काहीसं निवेदकानं उच्चारल्याचं आठवतंय. गाणं सुरू झालं.. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भरलो पानी.. सूर-स्वर-ताल-लय सारं काही जुळून आलेलं. मनात उतरणारं.. डोळ्यापुढे सीमेवर तनात असलेला जवान दिसत होता. त्याच्या धर्यापुढे आम्ही नतमस्तक होत होतो.. नवीन कडवं गायला लतानं सुरुवात केली.. ‘कोई सीख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई पंजाबी’.. आणि अचानक पहिल्या रांगेत काहीशी चुळबूळ सुरू झाली.. लताच्या स्वरांमुळे पंडित जवाहरलाल नेहरूंचे डोळे पाणावले.. आम्ही उठून नेहरूंना शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. हो, नेहरू रडत होते. आम्ही सारेच काहीसे हळवे झालो. एखाददुसराच असेल, जो हे गीत ऐकून रडला नसेल. कार्यक्रम संपला. एका नव्या उभारीसह आम्ही घरी परतलो. कार्यक्रम संपला होता. पण एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती. भारतीय संरक्षण व्यवस्थेला भक्कम करण्याचा. सीमा सुरक्षित असल्याशिवाय देश सुरक्षित नाही, याचं भान चीनविरुद्धच्या पराभवाने दिलं. परंतु संरक्षण व्यवस्था भक्कम केली पाहिजे, याचं सजग भान ‘ऐ मेरे वतन के लोगों.’ या वेदनेच्या शक्तिस्तोत्रानं जागृत झालं. चीनच्या युद्धानंतर भारतीय लष्करावर जास्तीतजास्त निधी खर्च करण्याची नीती भारताने अवलंबली. त्याचा परिणाम म्हणजे भारत-पाक युद्ध. भारतीयांच्या मनांना प्रज्वलित करण्याचं काम लताच्या स्वरांनी केलं. ही मनं अशीच प्रज्वलित राहायला हवीत..
शब्दांकन : टेकचंद सोनावणे
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 1:23 am