पाकिस्तानकडून होत असलेल्या अत्याचारांबद्दल बोलतना पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (पीओके) कार्यकर्ता सज्जाद राजा यांना अश्रू अनावर झाले. पाकिस्तान पीओकेमधील नागरिकांना जनावरांसारखी वागणूक देत असल्याचं सांगताना सज्जाद राजा यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेकडे पुढाकार घेत हे थांबवावं अशी विनंती केली. गुरुवारी जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत बोलताना त्यांनी पीओकेमधील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“आझाद काश्मीर निवडणूक कायद्याने पीओकेमधील नागरिकांचे सर्व घटनात्मक, नागरी आणि राजकीय हक्क हिरावून घेतले,” असल्याचं सज्जाद राजा यांनी यावेळी सांगितलं. “पीओकेमधील आम्ही नागरिक परिषदेकडे विनंती करतो की, पाकिस्तानला आम्हाला मिळणारी जनावरांसारखी वागणूक देण्यापासून रोखलं जावं. निवडणूक कायद्याने आमचे हक्क हिरावले आहेत,” असं ते म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितलं की, “हक्कांसाठी लढत असल्याने आमच्या घऱात आम्हाला देशद्रोही घोषित करण्यात आलं आहे. आमच्या राजकीय गोष्टींना अनधिकृत घोषित केलं जात आहे. यामुळे लष्कराला आमच्या लोकांची हत्या करण्याची मोकळीक मिळत आहे”. “पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये सीमेच्या दोन्ही बाजूकडील तरुणांची माथी भडकावण्याचं काम करत आहे. भारतासोबत लढण्यासाठी त्यांना तयार केलं जात,” असल्याचंही ते म्हणाले आहेत.

“पाकिस्तान पीओकेमधील दहशतवाद्यांना आश्रय देत असून तिथून अद्यापही कारवाया सुरु आहेत,” असा खुलासा सज्जाद राजा यांनी केला. परिषदेत बोलत असतानाच सज्जाद राजा यांना भावना अनावर झाल्या. “पाकिस्तानने आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं असून, आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आमचा आवाज ऐकला जाईल असा विश्वास आहे. शांतताप्रिय जगाने आमच्यासोबत जे सुरु आहे ते थांबवावं,” अशी विनंती सज्जाद राजा यांनी यावेळी केली.