पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाचे शंभर दिवस नुकतेच पूर्ण झाले आहेत. याबरोबरच परराष्ट्रमंत्रलायचे देखील १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्त बोलताना परारष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी यावेळी हे देखील म्हटले की, पाकव्याप्त काश्मीरवरची आमची भूमिका नेहमीच स्पष्ट व कायम आहे. पीओके हा भारताचा भाग आहे व आम्ही एकदिवस त्यावर प्रत्यक्ष ताबा मिळवू अशी अपेक्षा आहे. याबरोबर एस जयशंकर यांनी कलम ३७० हा द्विपक्षीय मुद्दा नाही तर अंतर्गत मुद्दा असल्याचेही स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आल्यापासून मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पीओके बाबत वक्तव्य केले आहे. अशातच केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते की, सरकारचे पुढील धोरण पीओकेला पुन्हा मिळवण्याचे आहे. तर जयशंकर यांनी कलम ३७० बाबत बोलताना म्हटले की, पाकिस्तानबरोबर कलम ३७० चा मुद्दा नाहीच असू शकत कारण हा मुद्दा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यांच्याबरोबर दहशतवादाचा मुद्दा आहे. कलम ३७० बाबत आंतरराष्ट्रीय मंचाने देखील भारताची भूमिका समजून घेतलेली आहे.

पाकिस्तानवर टीका करताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की, भारत शेजार धर्म निभावण्याचे धोरण अवलंबत आहे. मात्र शेजारी देशाकडून वेगळे धोरण अवलंबवले जात आहे. त्यांना आपली वर्तवणूक सुधारण्याची व दहशतवादाविरोधात कारवाई करण्याची आवश्यकता आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारने शंभर दिवसात केलेल्या विशेष कामांची देखील उजळणी केली. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण अधिक बळकट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.