जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्यानंतर आता दहशतवादी संघटना जम्मू काश्मीरमधील स्थिती बिघडवण्याच्या तयारीत आहेत. याचदरम्यान, आता पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हे दहशतवादी भारताविरोधात बोलताना दिसत आहेत. तसेच यामध्ये हे दहशतवादी काश्मीरमध्ये जिहादची धमकी देतानाही दिसत आहेत.

पाकिस्तानी अधिकारी दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीन आणि यूनायटेड जिहाद काऊंसिलला (यूजेसी) भारताविरोधात जिहाद पुकारण्यास प्रोत्साहित करत असल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे. तसेच यावेळी त्यांच्यासोबत हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सैयद सलाहुद्दीनदेखील या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसत आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानसोबतच दहशतवादी संघटनांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे.

हिजबुल मुजाहिद्दीनचा खालिद सैफुल्ला आणि नायब अमिरसोबत त्या संघटनेच्या काही दहशतवाद्यांनी गुरूवारी मुझफ्फराबादमध्ये प्रेस क्लबसमोर भारताविरोधात आंदोलन केले. कोणतीही कारवाई शब्दांपेक्षा जास्त काम करते. आम्ही जिहादसाठी तयार आहोत, असे सैफुल्ला यावेळी म्हणाला होता. तर दुसरीकडे मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद हा पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या जमात-उल-दावावर काही दिवसांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. अशातच दुसऱ्या दहशतवादी संघटनांसोबत हातमिळवणी करून तो कारवाया करण्याच्या तयारीत आहे.