भाजप नेत्यांकडून पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले सुरूच आहेत. यात आता खासदार योगी आदित्यनाथ यांची भर पडली असून त्यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. पाकिस्तानने भारताशी लढण्याचे धाडस केल्यास त्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. लवकरच पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताचा भाग बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गुरूवारी बलिया येथे एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. या वेळी त्यांनी भारताने बलुचिस्तान प्रकरणी ठाम भूमिका घेण्याचे आवाहन सरकारला केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी गुरूवारी काश्मीर विषयी केलेल्या टिप्पणीचाही खरपूस समाचार घेतला. काश्मीर समस्येला काँग्रेसच जबाबदार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे काश्मीरची जबादारी दिली असती तर हा प्रश्नच उपस्थित झाला नसता.
पीओके स्वतंत्र होण्याची वेळ आली असून लवकरच हा भाग भारतात असेल. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदने पाकिस्तानी सैन्य दलाला जम्मू काश्मीरमध्ये घुसण्याचे आवाहन केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत आदित्यनाथ यांनी शेजारच्या देशाने आपल्याकडून चारवेळा पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा तसा प्रयत्न करू नये, असा इशारा दिला.
तत्पूर्वी, फाळणीनंतर काश्मीरवासियांना पाकिस्तानात यायचे होते. परंतु भारताने बळजबरीने जम्मू आणि काश्मीरमध्ये सैन्य पाठवून तो भाग आपल्या ताब्यात ठेवला होता, असा आरोप हाफिज सईदने रविवारी कराची येथे एका रॅलीत केला होता. त्यावेळी महमंद अली जीना यांना काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्याची विनंती तत्कालीन सैन्यप्रमुखांनी केली होती. परंतु जीना यांनी ती फेटाळली होती. आता राहिल शरीफ यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्य पाठवून जीना यांच्याकडून राहिलेले काम पूर्ण करावे असे आवाहन केले होते.