सध्या जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक देश या करोनाच्या संकटाशी लढत आहे. करोना संकटाचा सामना सुरू असतानाच एका देशाकडून अजब घटना घडली. पोलंडनं आपलं शेजारी राष्ट्र झेक रिपब्लिकची जमीनाचा ताबा मिळवला असल्याची कबुली दिली आहे. पोलंडच्या संरक्षण मंत्रालयानं चुकून आम्ही त्यांच्या राष्ट्राच्या जमिनीचा ताबा घेतल्याचं म्हटलं आहे. गेल्या महिनाभरापासून झेक रिपब्लिकच्या जमिनीवर पोलंडनं ताबा मिळवल्याची माहिती समोर आली होती. सीमेचं संरक्षण करणाऱ्या जवानांनी करोना व्हायरसला थांबवण्यासाठी काही पावलं उचलली. त्यावेळी त्यांनी झेक रिपब्लिकमधील एका चॅपलवर ताबा मिळवला. तसंच ते काही दिवस त्या ठिकाणीही राहिल्याचं म्हटलं जात आहे.

एवढेच नव्हे तर पोलंडच्या सैनिकांनी झेक रिपब्लिकहून येणाऱ्या लोकांनाही आत येऊ दिलं नाही. त्यानंतर झेक रिपब्लिकच्याअधिकाऱ्यांनी पोलंड सरकारशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. ही घटना झेक रिपब्लिकमधील शहर मोरावियामध्ये घडली. पोलंडच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना चुकून ही घटना घडल्याचं म्हटलं. तसंच झेक रिपब्लिकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र अद्याप यावर उत्तर देण्यात आलं नाही.

सर्व प्रथम ही घटना स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. दरम्यान, त्यावेळी चॅपलच्या डागडुजीचं काम करणारा एका अभियंत्यानं जेव्हा त्या ठिकाणचा फोटो घेण्यास गेला, तेव्हा पोलंडच्या सैनिकांनी त्याला फोटो घेण्यापासून रोखलं. तसंच चॅपलकडे जाणारा रस्ताही अडवण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक वृत्तपत्रानं त्या ठिकाणी फोटोग्राफर पाठवून या घटनेची माहिती घेतली.

हे चॅपल झेक रिपब्लिकच्या सीमेच्या ३० किलोमीटर आत आहे. या ठिकाणी एक पाण्याचा प्रवाह दोन्ही देशांच्या सीमांना विभागतो. स्थानिक वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम पोलंडचे सैनिक सुरूवातीला पोलंडच्या सीमेतच होते. परंतु नंतर त्यांनी झेक रिपब्लिकच्या सीमेत प्रवेश केला. दरम्यान, ते किती दिवस त्या ठिकाणी राहत होते, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.