जम्मू-काश्मीरमध्ये राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेत जवानांना एका दहशतवाद्यास पकडण्यता यश आलं आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्यास पकडण्यात आले असुन, त्याची कसून चौकशी सुरू आहे. विशेष, म्हणजे यावेळी मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

या दहशतवाद्याकडून त्याच्या संघटनेच्या कारवायांसदर्भात महत्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जुनैद फारुक असं या दहशतवाद्याचं नाव आहे. बारामुल्ला पोलिसांना या दहशतवाद्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार संबंधित परिसरात शोधमोहीम राबवली गेली.

सीआरपीएफच्या १७६ व्या तुकडीसह बारामुल्ला पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. दहशतादी पकडण्यात आल्यानंतर परिसरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. या दहशतवाद्याचे पकडले जाणे पोलिसांसाठी अत्यंत महत्वाचे होते, असे देखील सांगितले जात आहे.

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा पथकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या तिन्ही मृत दहशतवाद्यांची ओळख पटली होती. जहांगीर रफीक वानी, राजा उमर मकबूल भट आणि उझेर अहमद भट अशी या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत.