कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये तीन पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तिघांनाही कुमारस्वामी लेआऊटजवळून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे भारतातील प्रवेश आणि वास्तव्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे नसल्याची माहिती मिळाली आहे. या तिघांसह पोलिसांनी एका भारतीयालाही ताब्यात घेतले आहे.

किरण गुलाम, समीरा आणि काशिफ समशुद्दीन अशी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या तिघा पाकिस्तानी नागरिकांची नावे आहेत. ते पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याशिवाय पोलिसांनी मोहम्मद या भारतीय नागरिकालाही ताब्यात घेतले आहे. तो केरळचा रहिवासी आहे. बंगळुरूचे पोलीस आयुक्त प्रवीण सूद यांनी सांगितले, की ”अटक करण्यात आलेले तिघे पाकिस्तानी नागरिक गेल्या नऊ महिन्यांपासून बेंगळुरूत वास्तव्यास आहेत. आपण भारतीय आहोत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी बोगस कागदपत्रेही तयार केली आहेत.” प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कतारमध्ये नोकरी करणारा भारतीय नागरिक मोहम्मद याने या तिघांना मदत केली आहे. हे सर्व मस्कतकडून काठमांडू आणि तेथून भारतात आले.

या अटकेनंतर आता पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. भारतात येण्याचा उद्देश जाणून घेण्यात येत आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे ते येथे वास्तव्य करत आहेत. एका स्थानिकाने त्यांना येथे घर मिळवून देण्यात मदत केली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच केरळचा रहिवासी असलेला मोहम्मद हा कतारमध्ये नोकरी करत होता, त्यावेळी एका पाकिस्तानी मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर त्याने यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, असा दावा स्थानिकांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पोलीस हा दावा खरा आहे का, याचा तपास करत आहेत.