आंध्र प्रदेश पोलिसांनी माओवाद्यांच्या एक महत्त्वाच्या म्होरक्यास अटक केली आहे. तीन राज्यांमध्ये जवळपास ५० जणांची हत्या करणाऱ्या या माओवाद्याला पकडण्यासाठी २० लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

सदर माओवाद्याचे नाव वाय. शिवा रेड्डी ऊर्फ किरण असे असून त्याच्यावर ७३ गुन्ह्य़ांची नोंद आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणमध्ये एक पोलीस निरीक्षक आणि गृहरक्षक दलाच्या दोन जवांनासह ५० जणांच्या हत्येमध्ये रेड्डी याचा हात आहे. वाय शिवा रेड्डी हा १९९१ पासून भूमिगत होता आणि गोरिला हल्ले करण्यात तो वाकबगार होता. पूर्व गोदावरी जिल्ह्य़ातून सोमवारी त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल हस्तगत करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.