केरळचा केंद्राविरूद्ध कारवाईचा इशारा
दिल्लीतील केरळ हाऊसमध्ये गोमांस दिल्याच्या कथित घटनेने आता राजकीय वादाचे वळण घेतले असून केरळ हाऊसच्या मेनूमध्ये म्हशीच्या मांसाचा वापर केलेल्या पदार्थाचा आज समावेश होता. दरम्यान, गोमांस दिले जात असल्याची खोटी तक्रार करणारा हिंदू सेनाप्रमुख विष्णू गुप्ता आला आज दिल्ली पोलिसांनी अटक केली. दरम्यान छापा टाकला ही चूक असल्याचे केंद्र सरकारने मान्य न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा केरळ सरकारने बुधवारी दिला.
कारवाईबाबत दिल्लीचे पोलीस उपायुक्त जतीन नरवाल यांनी सांगितले की, विष्णू गुप्ता यांचे जाबजबाब घेण्यात आले आहेत, पण त्याबाबत अधिक तपशील देता येणार नाही. दिल्ली पोलिसांनी केरळ अतिथिगृहात जाऊन अचानक छापा घातला होता.
पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी सांगितले की, पोलिसांना दूरध्वनीवर खोटी माहिती देणाऱ्या विष्णू गुप्ता यांच्यावर भादंवि कलम १८२ (खोटी माहिती देणे) अन्वये कारवाई करण्याचा विचार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे अधिकार निरपराध व्यक्तीविरोधात वापरणे भाग पाडण्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत गुप्ता यांनी दूरध्वनी केला होता. त्यात त्यांनी केरळ अतिथिगृहात गाईचे मांस दिले जात असल्याचे म्हटले होते. गुप्ता यांनी दिलेली माहिती खोटी होती. विष्णू गुप्ता यांना ताब्यात घेतले असून केरळ अतिथिगृहात जर आता कुणी खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे बस्सी यांनी सांगितले.
केरळ सरकारच्या परवानगीविना छापा टाकण्यात येण्याचा प्रकार औचित्याच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन करणारा आहे आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य संबंधांत बाधा येते, असे केरळचे मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण राज्य सरकारला स्वीकारार्ह नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्राच्या उत्तराची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, असेही चंडी म्हणाले. दिल्लीत गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे ते केरळ हाऊसमध्ये दिले जात नव्हते, मात्र म्हशीच्या मांसावर बंदी घालण्यात आलेली नसल्याने ते बुधवारपासून देण्यात येत आहे, त्याला कोणी विरोध केला तरी त्याची पर्वा नाही, असेही चंडी म्हणाले.
केरळ हाऊसवरील छाप्याबाबत केरळचे मुख्यमंत्री ओमेन चँडी यांनी आक्षेप घेतला होता. केंद्र सरकारवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली. या छाप्याचा माकपने निषेध केला आहे. काळ्या पैशांचा छडा लावण्याऐवजी केरळ हाऊसमध्ये गोमांस दिले जाते या काल्पनिक गोष्टीला सरकारचे प्राधान्य असल्याबद्दल माकपने आश्चर्य व्यक्त केले आहे.
दरम्यान, केरळ हाऊसमध्ये बुधवारी म्हशीचे मांस देण्यात आले आणि त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ अवघ्या ४५ मिनिटांतच संपले. आज जे बीफ फ्राय ठेवण्यात आले होते ते म्हशीचे मांस होते व दोनच दिवसांपूर्वी मीट फ्राय व मीट करी (बफेलो) असा उल्लेख मेनूमध्ये होता, पण आज त्यात बीफ फ्राय हा नवाच उल्लेख होता. माकप नेते एम. ए. बेबी व निलोत्पल बसू यांना केरळ अतिथीगृहात बीफ फ्राय खिलवण्यात आले.

केरळ अतिथीगृहाचे शिष्टाचार अधिकारी के.जी. जोसेफ यांनी सांगितले की, ही डिश आता या कँटीनमध्ये पुन्हा सुरू करण्यात आली आहे. केरळ अतिथीगृहाबाहेर जलद कृती दल तैनात केले आहे.
केरळ हाऊस गोमांस प्रकरण