उत्तर प्रदेश पोलीस गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी सध्या चकमकीचा आधार घेत आहे. सोमवारी रात्री मेरठ येथे पोलीस आणि काही गुंडांमध्ये चकमक पार पडली. या चकमकीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १५ हजारांचं बक्षिस असणारा गुंड ताज मोहम्मद जखमी झाला. यावेळी एक आरोपी मात्र घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला. फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, जखमी झालेल्या ताज मोहम्मदला जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याने पोलिसांसमोर हात जोडून दयायााचना करण्यास सुरुवात केली. पोलिसांसमोर हात जोडून आपल्या जीवाची भीक मागणा-या ताज मोहम्मदचा फोटो समोर आला असून, फोटोमध्ये तो रुग्णालयातील बेडवर झोपलेला दिसत असून पोलीस त्याच्यासमोर उभे आहेत.

मेरठमधील लिसाडी गेट पोलिसांनी फरार आरोपी ताज मोहम्मद आपल्या साथीदारासोबत जामिया येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासणी करण्यास सुरुवात केली. सर्च ऑपरेशन सुरु असताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. उत्तरादाखल पोलिसांनीही आरोपींवर गोळीबार केला ज्यामध्ये ताज मोहम्मद जखमी झाला. दुसरा आरोपी वसीम मात्र घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी ठरला. ताज मोहम्मदवर चोरी, दरोड्यासहित अन्य गुन्हे दाखल आहेत.

एकीकडे जिथे मेरठमधील पोलिसांनी चकमकीत एका आरोपीला अटक केली, तर दुसरीकडे एका आरोपीने स्वत: पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. कुख्यात आरोपी अरविंद यादवने सोमवारी गाजीपूर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करताना आपल्याला सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य घालवायचं आहे असं सांगितलं. उत्तर प्रदेशांनी आरोपींविरोधात सुरु केलेल्या मोहिमेमुळेच आपण आत्मसमर्पण करत असल्याचं त्याने सांगितलं.