पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी देशभरातून अनेक हात पुढे सरसावत आहेत. अनेकजण आपल्याला शक्य असेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेशातील एका पोलीस कॉन्स्टेबलने तर शहीदांच्या कुंटुबीयांसाठी निधी गोळा करता यावा यासाठी तीन दिवसांची सुट्टीच घेतली आहे. फिरोज खान असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. निधी गोळा करण्यासाठी फिरोज खान शहरभर दुचाकीवरुन फिरत लोकांना मदत करण्याचं आवाहन करत आहेत.

फिरोज खान सोबत एक बोर्ड घेऊन फिरत आहेत ज्यावर त्यांनी शहिदांच्या कुटुंबीयांसाठी निधी जमा करण्यास मदत करा असं लिहिलं आहे. १४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले. शहीद झालेल्यांपैकी १२ जवान उत्तर प्रदेशचे होते.

‘मी निधी गोळा कऱण्यासाठी तीन दिवसांची सुट्टी मागितली आणि ती मंजूर झाली. मला जे शक्य आहे ते मी करत आहे. मला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे’, असं फिरोज खान यांनी सांगितलं आहे.

फिरोज खान यांनी एएनआयशी बोलताना आपण लोकांकडून आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा करणार असल्याची माहिती दिली आहे. आपण एक पोलीस कर्मचाऱी असल्याने सीआरपीएफमधील जवान शहीद होणे आपला भाऊ गमावण्यासारखे आहे असं फिरोज खान यांनी म्हटलं आहे.