सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनानंतर कठोर निर्बंध

मंगळुरू, तिरुअनंतपूरम : केरळमधून मंगळुरू येथे आलेल्या पन्नास लोकांना त्यांच्याकडे ओळखपत्रे नसल्याने स्थानबद्ध करण्यात आले. नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात गुरुवारी झालेल्या हिंसाचारात दोनजण ठार झाल्यानंतर येथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान मृतांच्या नातेवाईकांच्या मुलाखती घेत असताना वेंडलॉक रुग्णालयाजवळ अटक करण्यात आलेल्या आठ पत्रकारांची सुटका करण्यात आली असून त्यात न्यूज २४, आशियानेट, न्यूज १८, मातृभूमी या वाहिन्यांच्या पत्रकारांचा समावेश होता. माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी गुरुवारी करण्यात आलेल्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली असून पोलिसांनीच हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला आहे. केरळ पोलिसांनी त्यांच्या राज्यातील उत्तरेकडील भागात सतर्कता वाढवली असून केरळातून मंगळुरूला थलापड्डी सीमेनजीक आलेल्या लोकांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यांच्याकडे ओळखपत्रांची मागणी करण्यात आली. ओळखपत्र नसल्याने केरळच्या पन्नासजणांना अटक करण्यात आली. वेंडलॉक रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांच्या मुलाखती घेणाऱ्या पत्रकारांनाही ताब्यात घेण्यात आले. काही माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे व मोबाईल जप्त करण्यात आले. मंगळुरूत अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले. तेथे मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आले असून ही बंदी २२ डिसेंबपर्यंत लागू राहणार आहे, असे पोलीस आयुक्त पी. एस. हर्ष यांनी सांगितले. गुरुवारी आंदोलनात दोनजण ठार झाले होते.

प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना निदर्शनांना हिंसक वळण लागले होते व नंतर मंगळुरूत २२ डिसेंबपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. आंदोलकांनी मंगळुरू उत्तर पोलीस ठाण्याला वेढा घालून अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला असता दोनजण ठार झाले. केरळच्या उत्तर भागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून पोलीस महासंचालक डी. लोकनाथ बेहरा यांनी सांगितले की, वायनाड, कोझीकोड, कसरगोड, कन्नूर जिल्ह्य़ात सतर्कता ठेवली आहे. केरळ रस्ते वाहतूक मंडळाच्या मंगळुरूकडे जाणाऱ्या  बस रद्द करण्यात आल्या आहेत. वाहतूक मंत्री ए. के. शशींद्रन यांनी सांगितले की, स्थिती सुरळीत झाल्यानंतरच बससेवा सुरू केली जाईल.