इंडोनेशियन सरकारला सीबीआयचे पत्र

आंतरराष्ट्रीय माफिया छोटा राजन याला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे एक रविवारी इंडोनेशियातील बाली येथे दाखल झाले. या पथकाला कमांडोजचे संरक्षण देण्यात आले आहे.
विविध गुन्ह्यात राजन भारताल हवा आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी एक अर्ज सीबीआयने इंडोनेशियन सरकारला सादर केला. भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी इंडोनेशियातील पोलीस कोठडीत राजनची भेट घेतली. राजनैतिक विभागाचे प्रथम सचिव संजीवकुमार अग्रवाल यांनी बाली येथील कोठडीत राजनची सुमारे अर्धा तास भेट घेतली.
अटक केल्यापासून राजनला तेथे ठेवण्यात आले आहे. अग्रवाल हे जाकार्ता येथील दूतावासात कार्यरत असून, ते आज सकाळी बाली येथे आले आणि त्यांनी राजनची भेट घेतली. राजनला कोठडीत ठेवल्याचे इंडोनेशियाच्या पोलिसांनी कळवल्यानंतर दोन दिवसांनी राजनशी संपर्क होऊ शकला आहे. राजनवर रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियातून इंडोनेशियात जात असल्याचे कळवण्यात आले होते, त्यामुळे त्याला तेथील पोलिसांनी अटक केली. इंडोनेशियाबरोबर प्रत्यावर्तन करार नसल्याने भारतीय दूतावास अधिकाऱ्यांनी राजन भारतीय असल्याची ओळख पटवणारी कागदपत्रे सादर केली होती. सीबीआयचे अधिकारी, मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस यांचे संयुक्त पथक त्याला भारतात आणण्यासाठी गेले आहे. राजनविरोधात मुंबई पोलिसात किमान ७५ तर दिल्ली पोलिसात किमान सहा गुन्हे दाखल आहेत. सीबीआय ही इंटरपोलची भारतातील संपर्क संस्था असल्याने त्यांचे अधिकारी पथकात आहेत. नंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. मुंबई पोलिसात त्याच्याविरोधात खुनाचे वीस गुन्हे दाखल असून, दहशतवाद व विध्वंसक कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार चार गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यानुसार वीस गुन्हे दाखल आहेत. राजन हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा साथीदार होता.

छोटा राजनप्रकरणी भारत आणि इंडोनेशियादरम्यान प्रलंबित असलेल्या प्रत्यार्पण कराराबाबत देवाणघेवाण सुरू असल्याची माहिती उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी दिली. हमीद अन्सारी इंडोनेशियासह दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अन्सारी आयुर्वेद, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि ऊर्जा पुनर्निर्माण या क्षेत्रातील सहकार्याबाबत चर्चा करणार आहेत. इंडोनेशियाबरोबर प्रत्यार्पण करारावर भारताने २०११मध्ये स्वाक्षरी केली होती. मात्र, प्रलंबित असलेली प्रक्रिया लवकर पूर्ण करून छोटा राजनला भारतात नेण्यात येईल, असेही अन्सारी यांनी स्पष्ट केले.