उत्तर प्रदेशातील दादरी येथील घटना

सोमवारी सकाळी गुन्हेगारांना पकडण्याच्या मोहिमेवर गेलेले पोलीस उपनिरीक्षक अख्तर खान गुन्हेगारांशी चकमकीत मारले गेले. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ते फुकरन व जावेद या दोघांच्या दादरी येथील अड्डय़ावर छापा टाकण्यासाठी गेले होते. हे ठिकाण दिल्लीपासून ३० कि.मी दूर आहे. खान हे पोलीस पथकाचे नेतृत्व करीत होते व ते गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी घुसले. हे गुन्हेगार सशस्त्र दरोडय़ाच्या गुन्ह्यात हवे होते. संशयितांच्या घरात ते गेले असता काहींनी गोळीबार सुरू केला, त्यात एक गोळी खान यांच्या मानेला लागली त्यात ते जागीच कोसळले. छापामारणाऱ्या पथकाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला पण संशयित पळून गेले. खान यांना दादरी येथील सरकारी रुग्णालयात आणले असता त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अनुराग सिंह यांनी दिली. खान हे १९९८ मध्ये पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रूजू झाले व आता त्यांची नेमणूक कोट पोलीस स्टेशन येथे होती. ते मूळ अलिगडचे होते. ते अंतर्गत परीक्षा देऊन उपनिरीक्षक झाले होते. या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून मीरतचे पोलीस उपमहानिरीक्षक लक्ष्मी सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास चालू आहे. खान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला असून तो नंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी खान हे शूर पोलीस अधिकारी होते असे ट्विटरवर म्हटले आहे.