लखनऊ : हाथरसमध्ये बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय लोकदल आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी रविवारी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मोठय़ा संख्येने आलेल्या या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी उभारलेले अडथळे बाजूला करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रीय लोकदलाने म्हटले आहे की, पक्षाचे उपाध्यक्ष जयंत चौधरी आणि अन्य कार्यकर्त्यांशी पोलिसांनी दुवर्तन केले. पक्षाचे उत्तर प्रदेश प्रमुख मसूज अहमद यांनी भाजप हा विरोधकांना दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मुझप्फरपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे दिले. परंतु अखेरीस चौधरी यांच्यासह समाजवादी पक्षाच्या अन्य एका शिष्टमंडळासही पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली.

भीमआर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनाही प्रारंभी पोलिसांनी या गावात जाण्यापासून रोखले, परंतु नंतर त्यांना या कुटुंबाला भेटण्याची  मुभा देण्यात आली. त्यांनी सांगितले की, हे कुटुंब तेथे सुरक्षित नसून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात यावी. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणीही आझाद यांनी केली.