केरळच्या शबरीमाला मंदिरातील दानपेटीत पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भाविकांनी मंदिराच्या हुंडीत टाकलेल्या पैशांची मोजदाद सुरू असताना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर आता पोलिसांनी गंभीर दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंडीतील पैशांची मोजदाद सुरू असताना प्रकार घडला. नोटा कन्व्हेयर बेल्टवरून पुढे सरकरत असताना येथील कर्मचाऱ्यांच्यादृष्टीस एक वेगळी नोट दिसून आली. अधिक तपासणी केली असता ही पाकिस्तानी चलनातील २० रूपयांची नोट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंदिर प्रशासनाकडून पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली.

मासिकपाळीदरम्यान महिलांना मंदिरात प्रवेश नको; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

शबरीमाला मंदिरातील दानपेटीत भाविकांकडून विदेशी चलनातील नोटा टाकण्याचा प्रकार नवीन नाही. मात्र, ही नोट पाकिस्तानी चलनातील असल्याने आम्ही विशेष दक्षता घेत आहोत. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. केरळमधील शबरीमाला मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात भरणाऱ्या जत्रेसाठी देश विदेशातून लाखो भाविक याठिकाणी येतात. त्यानंतर केवळ प्रत्येक मल्याळम महिन्याच्या सुरूवातीला पूजेसाठी पाच दिवस मंदिर खुले असते. हा काळ वगळता इतर दिवस मंदिर बंद असते.