News Flash

बागेत नमाज पठण केलात तर कारवाई करु, नोएडा पोलिसांचा इशारा

काही हिंदू संघटनांनी पोलिसांकडे उघड्यावर नमाज पठण केल्याने परिसरातील एकोपा बिघडत असल्याची तक्रार केली होती

नोएडा पोलिसांनी बाग तसंच सार्वजनिक ठिकाणं धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरलं जाऊ शकत नाही असं जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर सेक्टर 58 मध्ये असणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक बागेत शुक्रवारी नमाज पठण करु नये अशी सूचना करण्यात आली आहे. पोलिसांनी कंपन्यांसाठी नोटीस जारी केली असून कर्मचाऱ्यांनी या नियमाचं उल्लंघन केल्यास कंपन्याना जबाददार ठरवण्यात येणार आहे.

नोटीस जारी झाल्यानंतर कंपन्यांनी यासंबंधी स्पष्ट चित्र निर्माण व्हावं यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. कंपन्यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. नोटीस जारी होताच औद्योगिक केंद्र असणाऱ्या नोएडामध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी लगेचच स्पष्टीकरण देत हा निर्णय कोणत्याही धर्माविरोधात नसल्याचं म्हटलं आहे.

एनडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, काही हिंदू संघटनांनी पोलिसांकडे उघड्यावर नमाज पठण केल्याने परिसरातील एकोपा बिघडत असल्याची तक्रार केली होती. यानंतर 58 पोलीस स्थानकांना कंपन्यांना नोटीस पाठवण्यास सांगण्यात आलं. पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये कोणालाही शुक्रवारी नमाज पठण करण्याकरिता पार्कात प्रवेश दिला जाणार नाही असं स्पष्ट लिहिलं आहे.

‘तुमचे मुस्लिम कर्मचारी नमाज पठण करण्यासाठी सेक्टर 58 मधील पार्कात जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. कृपया त्यांनी अस करु नये अशी सूचना द्या. यनंतरही जर ते पार्कात गेले तर नियमांचं उल्लंघन केल्यासाठी कंपनी जबाबदार असेल’, असं नोटीसमध्ये लिहिलं आहे. नोएडाचे एसएसपी अजय पाल यांनी ही ऑर्डर कोणत्याही एका ठराविक धर्माला टार्गेट करण्यासाठी नसल्याचं सांगितलं आहे.

‘काहीजणांना सेक्टर 58 मधील पार्कात प्रार्थना करण्यासाठी परवानगी मागितली होती, पण दंडाधिकाऱ्यांनीच ती परवानगी नाकारली आहे. मात्र अद्यापही तिथे लोक जमा होतात. या नोटीशीतून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाला परवानगी मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे’, असं पाल यांनी सांगितलं.

पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही तिथे जाऊन नमाज पठण करणाऱ्या मौलाना नौमान आणि त्यांच्या मित्राला अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. आपण गेल्या पाच वर्षांपासून तिथे नमाज पठण करत असून यामुळे शांतता भंग पावत असल्याचं पोलिसांनी सांगितल्यांचं मौलाना नौमान यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 7:06 pm

Web Title: police notice to companies not to offer namaz in park
Next Stories
1 Flashback 2018: ऑर्डर ऑर्डर! सुप्रीम कोर्टाने २०१८ मध्ये दिलेले ऐतिहासिक निर्णय
2 धक्कादायक ! तीन महिन्यांच्या गर्भवती गाईवर बलात्कार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
3 मुहूर्तावर दफन करण्यासाठी तो आईच्या मृतदेहासमोर १८ दिवस बसला
Just Now!
X