एका व्यक्तीने सुपर मार्केटमध्ये केलेल्या गोळीबारात एका पोलिसासह दहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. अमेरिकेतील कोलोराडोमध्ये असलेल्या बोल्डर येथील मार्केटमध्ये हा गोळीबार करण्यात आला. या घटनेत गोळीबार करणारा आरोपीही जखमी झाला असून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बोल्डरमधील टेबल मेसा परिसरात असलेल्या किंग सुपर्स ग्रोसरी स्टोरमध्ये दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. सुपर मार्केटमध्ये हिंसा घडल्याची माहिती आम्हाला मिळाली. मात्र, कोणत्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला, याची माहितीबद्दल कळलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बोल्डर पोलीस विभागाचे प्रमुख कमांडर केरी यामगुची यांनी या घटनेविषयी अधिकची माहिती दिली. तपास अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळाची पाहणी केली जात असून, नक्की किती लोकांचा मृत्यू झाला आहे, हे अजून कळू शकलेलं नाही. या घटनेत अनेक लोक मरण पावले आहेत आणि दुःखद बाब म्हणजे मृतांमध्ये एक बोल्डरमधील पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे,” असं यामगुची यांनी सांगितलं.

घटनेत मरण पावलेल्यांची संख्या नंतर सांगितली जाईल, असं बोल्डरच्या प्रशासनानं म्हटलं आहे. तर काही स्थानिक वृत्तवाहिन्यांनी या घटनेत सहा जणांना प्राण गमवावे लागले असल्याचं म्हटलं आहे. “गोळीबाराच्या ठिकाणाहून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रक्तपात झालेल्या ठिकाणी ही व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली, अशी माहिती यामगुची यांनी दिली. त्यांनी या व्यक्तीविषयी अधिकची माहिती देण्याचं टाळलं.

स्थानिक वृत्तवाहिन्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य प्रसारित केली. एक शर्ट न घातलेला, दाढी वाढवलेला, बॉक्सर शॉर्टस आणि हातात हातकड्या घातलेल्या व्यक्तीला दूर घेऊन जाताना दिसत आहे. त्याला स्ट्रेचरवर ठेवलं गेलं आणि नंतर रुग्णवाहिकेत नेण्यात आलं. त्या व्यक्तीचे पाय रक्ताने माखलेले होते आणि तो लंगडत चालत होता, असं दिसत आहे.