उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाजपा नेत्याला पोलीस अधिकाऱ्याला आपली ओळख सांगणं चांगलंच महागात पडलं. भाजपा नेत्याने ओळख सांगताच पोलीस अधिकाऱ्याने मग तर अजून मारणार म्हणत चांगलाच चोप दिला. इतकंच नाही तर विरोध केल्याने नेत्याला थेट तुरुंगात डांबलं. नेत्याला मारहाण केल्याची बातमी वाऱ्याप्रमाणे शहरात परसली आणि भाजपा नेते, कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी करुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अखेर पोलीस अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

कानपूरमधील पनकी इंडस्ट्रियल परिसरात कालव्याशेजारी एका घराचं बांधकाम सुरु असताना दोन गटांमध्ये वाद झाला. यावेळी भाजपाच्या ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्य़क्ष अजय पाल अच्चू तिथे पोहोचले. ज्या घराचं बांधकाम सुरु होतं ते त्यांच्या मित्राचं होतं. यावेळी पोलीस अधिकारी अशोक वर्मा घटनास्थळी पोहोचले. आरोप आहे की, अजय पाल अच्चू यांनी ओळख सांगताच अशोक वर्मा यांनी त्यांना मारहाण केली. इतकंच नाही तर विरोध केला असता त्यांना तुरुंगात डांबलं.

अजय पाल अच्चू यांनी केलेल्या आरोपानुसार, आपण जेव्हा अशोक वर्मा यांना आपली ओळख सांगितली तेव्हा त्यांना शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. शिवीगाळ केल्याचा विरोध केला असता त्यांनी मारहाण केली. भाजपात आहेस तर मग नक्कीच मारणार असंही ते म्हणाल्याचं अजय पाल अच्चू यांनी सांगितलं आहे.

अजय पाल अच्चू यांना मारहाण झाल्याची कळताच शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. शेवटी एसएसपी अनंत देव यांनी अशोक वर्मा यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी कऱण्याचा आदेश दिला. अशोक वर्मा यांच्याविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतरच कार्यकर्ते शांत झाले.