News Flash

IPS अधिकाऱ्यानं भ्रष्टाचाराविरोधात दिलं भाषण; तासाभरातच लाचप्रकरणी झाली अटक!

दोन महिन्यांपासून येत होत्या तक्रारी

राजस्थानात एक विचित्र प्रकरणं समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त भाषण दिल्यानंतर पोलीस उप-अधीक्षकाला लाच घेतल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. माधोपूर येथे बुधवारी अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) कार्यालयात आंतरारष्ट्रीय दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात डीएसपी मीणा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “आपल्याला संपूर्ण प्रामाणिकपणे भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने लाच मागितली तर १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा,” असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

भाषणानंतर एक तासानं झाली अटक

विशेष म्हणजे या भाषणाच्या एक तासानंतर डीएसपी मीणा यांना ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच त्यांना लाच देणाऱ्या जिल्हा परिवहन अधिकाऱ्यालाही अटक झाली. एसीबीच्या कार्यालयात असलेल्या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला खुद्द एसीबीनंच जाळ्यात अडकवल्याचं उदाहरण पहिल्यांदाच पहायला मिळालं आहे. एसीबीला अनेक प्रयत्नांनंतर डीएसपी मीणा यांच्याविरोधात पुरावे मिळाले होते. या पुराव्यांच्या आधारे एसीबीची टीम आणखी काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करु शकते.

दोन महिन्यांपासून येत होत्या तक्रारी

एसीबीचे महासंचालक बीएल जोशी यांनी सांगितलं की, “कोटा येथील आकाशवाणी कॉलनीत राहणाऱ्या डीएसपी भैरुलाल मीणा जे सवाई माधोपूरमधील एसबी पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत. त्यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. एसबी चौकात अधिकाऱ्यांना बोलावून ते पैसे घेत असतं. त्यामुळे एसीबीची टीम सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून होती.”

बुधवारी या चौकात एसीबीची टीम पोहोचली तेव्हा करौली येथील दलपूरा येथे राहणाऱ्या डीटीओ महेशचंद मीणा त्यांना मासिक हप्त्याचे ८० हजार रुपये देत होते. दरम्यान, डीएसपी मीणा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर एसीबीच्या टीमला जमिनींची कादपत्रे आणि १.६१ लाख रोख रुपये आढळून आले. आता एसीबीची टीम त्यांच्या अन्य ठिकाणांचा शोध घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 3:09 pm

Web Title: police officer gives speech against corruption arrested in bribery case within an hour aau 85
Next Stories
1 “आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणार नवं संसद भवन”
2 भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कारवर तुफान दगडफेक
3 “चित्रपटातील आयटम डान्स, जाहिराती आणि पॉर्न बलात्काराची मानसिकता निर्माण करतात”
Just Now!
X