पोलीस अधिकारी जखमी
जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचे (जेकेएलएफ) प्रमुख यासिन मलिक यांच्या अटकेचा निषेध करणारे निदर्शक आणि सुरक्षा दलांचे कर्मचारी यांच्यात शुक्रवारी काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी झालेल्या चकमकीत एक पोलीस अधिकारी जखमी झाला.
राजौरी जिल्हय़ात गाव सुरक्षा समितीच्या एका सदस्याने गुरुवारी एका महिलेची तिच्या अल्पवयीन मुलासह हत्या केल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणारे जेकेएलएफचे अध्यक्ष मोहम्मद यासिन मलिक यांना त्यांच्या आठ सहकाऱ्यांसह पोलिसांनी स्थानबद्ध केल्यानंतर या चकमकींना सुरुवात झाली.
गाव सुरक्षा समित्या बंद करण्यात याव्यात, अशी मागणी करणाऱ्या घोषणा देत मलिक व त्यांचे सहकारी लाल चौकाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना बुदशाह चौकात अडवले. यामुळे निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या अनेक नळकांडय़ा फोडल्या. श्रीनगरमधील जामा मशिदीच्या बाहेर पाकिस्तान व आयसिसचे झेंडे फडकवणाऱ्या निदर्शकांचा पोलिसांशी संघर्ष
झाला.
युवकांचे गट आणि पोलीस यांच्यात शुक्रवारच्या नमाजानंतर सुरू झालेल्या या चकमकी सायंकाळपर्यंत सुरूच होत्या. बंदीपोरा जिल्हय़ात काल सायंकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या उमैस अहमद शेख या दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारानंतर पुलवामा जिल्हय़ात दगडफेक करणाऱ्या निदर्शकांवरही पोलिसांना अश्रुधुराच्या फैरी झाडाव्या लागल्या.