श्रीनगरच्या खान्यार भागात रविवारी एका दहशतवाद्याने एका पोलीस अधिकाऱ्याची जवळून गोळ्या घालून हत्या केली. तर जम्मूतील घटनेत सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.

श्रीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येची घटना रविवारी दुपारी १.३०च्या सुमारास घडली. दहशतवाद्याने पोलीस उपनिरीक्षक अर्शीद अहमद यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यात ते जखमी झाले. त्यांना सौरा येथील शेर-ए-काश्मीर वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या भागाला सुरक्षा दलांनी वेढा घातला असून, हल्लेखोराच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. जंगल भागात गस्त घालणाऱ्या लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. यात एक दहशतवादी ठार झाला. त्याची ओळख अद्याप पटली नसून, तो कोणत्या गटाचा होता हेही उघड झालेले नाही.

सीमेपलीकडून घुसखोरी करण्यात यशस्वी झालेला दहशतवाद्यांचा एक नवा गट जंगल भागात लपून असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, मंजाकोटे व ठाणामंडीच्या काही भागांत शोधमोहीम हाती घेण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.