आंध्र प्रदेशमधील कर्मचारी राज्य विमा घोटाळा (ईएसआय) प्रकरणामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे निकटवर्तीय आमदार अत्वन्नायडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तेलगू देसम पार्टीचे उप नेते आणि माजी मंत्री अत्वन्नायडू यांना ईएसआय कॉर्पोरेशनमध्ये १५१ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली. या प्रकरणात अत्वन्नायडू यांच्याबरोबरच इतर पाच जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र अत्वन्नायडू यांना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांना खूपच कष्ट करावे लागले. कारण अधिकाऱ्यांनी अत्वन्नायडू यांच्या घरी पोहचले तेव्हा त्यांच्या निवासस्थानाचे सर्व दरावजे बंद करुन घेण्यात आले होते. पोलीस आणि एसीबीच्या अधिकाऱ्यांना कुंपणावरुन उड्या मारुन घरात प्रवेश करावा लागला. यासंदर्भातील व्हिडिओ एएनआयने पोस्ट केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे सहसंचालक रवि कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार एसीबीचे अधिकारी अत्वन्नायडू यांना  त्यांच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील घरामधून अटक करण्यासाठी गेले होते. मात्र त्यावेळी त्यांच्या निवासस्थानाचे दरवाजे बंद होते. त्यामुळेच काही फूट उंच भिंतींवर चढून अधिकाऱ्यांना घरात प्रवेश करावा लागला.

याचबरोबर ईएसआयचे माजी निर्देशक सी रवी कुमार यांना तिरुपती तर जी कुमार यांना राजामहेंद्रवरम येथून अटक करण्यात आली आहे. ईएसआयचे संयुक्त निरदेशक जनार्दन, अधीक्षक चक्रवर्ती आणि एका वरिष्ठ सहाय्यकाला विजयवाडा येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. करण्यात येणारे आरोप आणि तपासामध्ये उपकरणांच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. हा घोटाळा झाला तेव्हा अत्वन्नायडू हे श्रम मंत्री म्हणून कार्यरत होते.