न्यायाधीशांना बडतर्फ करण्याबाबतच्या खटल्यात पाकिस्तानचे माजी अध्यक्ष मुशर्रफ (वय ६९) यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. अटक टाळण्यासाठी मुशर्रफ यांनी गुरुवारी न्यायालयातून पलायन केले होते, पण ते अयशस्वी ठरले. त्यांना दोन दिवसांची तात्पुरती कोठडी देण्यात आली असून, अशा प्रकारच्या कायदेशीर कारवाईला सामोरे जात असलेले ते पाकिस्तानचे पहिलेच माजी लष्करप्रमुख होत.
पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटकेची कार्यवाही केली. मुशर्रफ यांना न्यायदंडाधिकारी मोहंमद अब्बास शाह यांच्यासमोर हजर करण्यात आले. वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर माजी लष्करप्रमुखांना दोन दिवसांची तात्पुरती कोठडी देण्यात आली. त्यांना दोन दिवसांत दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला. त्यांच्यावर २००७ मधील आणिबाणीदरम्यान त्यांनी केलेल्या कृत्यांबद्दल खटला चालविण्यात यावा, असा आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारीच दिला होता.
या निकालाविरोधात मुशर्रफ सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. आणिबाणीदरम्यान सरन्यायाधीश इफ्तिखार चौधरी यांच्यासह ६० न्यायाधीशांना बंदिवासात ठेवल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ाच्या तपासकामात ते पोलिसांना सहकार्य करीत नसल्याने उच्च न्यायालयाने त्यांना दिलेला जामीन रद्द केला होता. यानंतर दिवसभरातच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मुशर्रफ यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांना तुरुंगात ठेवता येणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट केले. याआधी मुशर्रफ यांना न्यायालयीन कोठडी देण्यास हरकत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले. याचबरोबर न्यायालयीन कोठडी दिल्यास मुशर्रफ यांना त्यांच्या फार्म हाऊसवरच स्थानबद्धतेत ठेवता येईल, या फार्म हाऊसलाच पर्यायी तुरुंग म्हणून जाहीर करता येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, कागदपत्रांची पूर्तता व्हायची असल्याने मुशर्रफ यांच्या वकिलांना अटकेच्या आदेशाला गुरुवारीच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे शक्य झाले नाही.
मुशर्रफ यांनी २००७ या वर्षी पाकिस्तानात आणिबाणी लागू केली होती. या काळातील त्यांच्या कृत्यांबद्दल अनेकांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत.

काय पडसाद उमटणार?
– न्यायालय आणि लष्कर यांच्यात संघर्षांची चिन्हे
– माजी लष्कप्रमुखावरील कारवाईने लष्करात अस्वस्थता
– लष्करप्रमुख जनरल अशफाक कयानी यांनादेखील मुशर्रफविरोधातील खटल्याची झळ बसण्याची शक्यता. कयानी हे मुशर्रफ यांचे एकेकाळचे निकटवर्तीय.