श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज धनुष्का गुणतिलकाची, लंकन पोलिसांकडून बलात्कार प्रकरणात चौकशी करण्यात आलेली आहे. कोलंबो येथील एका हॉटेलवर नॉर्वेची रहिवासी असलेल्या एका महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. या घटनेत गुणतिलकाचा मित्र संदीप जुद सेलिहा हा आरोपी असल्याचं समजंतय. या प्रसंगादरम्यान धनुष्का गुणतिलका हॉटेलमध्ये उपस्थित असल्यामुळे श्रीलंकन पोलिसांनी त्याची चौकशी केल्याचं समजतंय. या घटनेनंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने गुणतिलकेचं निलंबन केलं आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत गुणतिलकाने आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. ही घटना घडली तेव्हा मी हॉटेलमध्ये झोपलेला होता, आणि आपला मित्र व पीडित महिलेमध्ये नेमकं काय घडलं हे मला माहिती नाही असं गुणतिलकाने पोलिसांना सांगितलं आहे. संदीप सेलिहा हा श्रीलंकन वंशांचा ब्रिटीश नागरिक आहे. या घटनेनंतर पीडित महिलांनी कोलंबो पोलिसांकडे याबद्दल तक्रार दाखल केली असून, संदीपला अटक करण्यात आलेली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुणतिलकावर सध्या कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाहीये. मात्र या प्रकरणात गरज पडल्यास त्याला श्रीलंकन न्यायालयासमोर हजर रहावं लागणार आहे. श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान हा प्रकार घडल्याचं समोर येतंय. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्ड गुणतिलकाबद्दल निर्णय घेणार आहे.