तेलंगणामध्ये अपहरणाचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी बुरखा घातलेल्या चार जणांनी एका डॉक्टरचे अपहरण केले. विशेष म्हणजे या अपहरणकर्त्यांनी त्या डॉक्टरांच्या सुटकेसाठी रोख रक्कम नाहीतर चक्क १० कोटी बिटकॉईनची मागणी केली होती. तसेच, ज्या बंदुकीचा धाक दाखवून या डॉक्टरचे अपहरण केले गेले होते. ती बंदुक देखील बनावट असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना या गुन्हेगारांना अटक करण्यात अखरे यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगा रेड्डी जिल्ह्यातील किस्मतपूर रुग्णालयात काम करणारे डॉक्टर हुसैन यांचे मंगळवारी अपहरण झाले होते. यानंतर त्यांना एका सुमसाम ठिकाणी खोलीत डांबण्यात आले होते. ते अपहरणकर्ते मराठीत बोलत होते असे देखील पोलिसांनी सांगितले आहे. अपहरणकर्त्यांनी डॉक्टरास अन्य चार लोकांकडे सोपवलं होतं, जे एक जीप घेऊन आले होते. त्यानंतर त्यांना बंगळुरू येथील शिवमोगा येथे जाण्यास सांगण्यात आले होते.

सायबराबाद पोलिसांनी या अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची १० पथकं तयार केली होती. सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीनंतर शोधमोहीम सुरू झाली होती. डॉक्टर हुसैन हे बंडलागुडा येथील रहिवासी असून, एका खासगी रुग्णालयात काम करतात. अपहरणकर्ते ज्या गाडीतून डॉक्टरांना नेत होते, त्या गाडीचा पोलिसांनी पाठलाग केला व डॉक्टरांना गुन्हेगारांच्या तावडीतून सोडवले. यावेळी एका अपहरणकर्त्यास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. मात्र, अन्य तीन जणांनी शेतातून पळ काढला. डॉक्टरास त्या गाडीत दोरीने बांधून बसवले गेले होते. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, या डॉक्टरकडे मोठ्याप्रमाणावर वडिलोपार्जित संपत्ती आहे व ही बाब अपहरणकर्त्यांना देखील माहिती होती. त्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे.