काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या हत्याप्रकरणातील काही पुरावे निश्चित करण्यासाठी तीन महत्त्वाच्या साक्षीदारांची ‘लाय-डिटेक्टर’ चाचणी घेण्याची इच्छा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे, असे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले.
या प्रकरणात जवळपास १२ साक्षीदारांची लाय-डिटेक्टर चाचणी घेण्यात येणार असल्याचे सूचित केले जात आहे. सुनंदा पुष्कर यांच्या पतीच्या घरात काम करणारा नारायण सिंह, वाहनचालक बजरंगी आणि कुटुंबीयांचा मित्र संजय दिवाण यांची लाय-डिटेक्टर चाचणी घेण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे.
शशी थरूर यांचीही लाय-डिटेक्टर चाचणी घेण्यात येणार आहे का, असे विचारले असता बस्सी यांनी, आपण भाकीत करणार नाही, असे सांगितले. कृती आराखडय़ानुसार तपास करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.