‘कॅश फॉर व्होट’ घोटाळ्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि नामनियुक्त आमदार यांच्यातील संभाषणाची फीत प्रसारित करणाऱ्या ‘टी न्यूज’ दूरचित्रवाणी वाहिनीवर आंध्र प्रदेश पोलिसांनी नोटीस बजावली आहे. हा प्रकार कळताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जोरदार निदर्शने केली.
चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणमधील नामनियुक्त आमदार एल्व्हिस स्टीफन्सन यांच्यातील संभाषणाची फीत सदर वाहिनीने प्रसारित केली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावे, असे नायडू हे स्टीफन्सन यांना सांगत असताना झालेल्या संभाषणाची फीत प्रसारित केल्याने खळबळ माजली होती.
आंध्र प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी रात्री वाहिनीवर नोटीस बजावली असून त्यांना तीन दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. जी फीत प्रसारित करण्यात आली ती बदनामी करणारी असल्याने आपल्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, असे नोटिशीत म्हटले आहे. जी फीत प्रसारित करण्यात आली, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि फीत अर्धसत्य असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. दरम्यान, फुटेजची शास्त्रोक्त पद्धतीने वैधता तपासून पाहिल्याविना नोटीस बजाविण्याचा पोलिसांना अधिकार नाही, असे या वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण रेड्डी यांनी म्हटले आहे. याबाबत आम्ही राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करणार आहोत, असेही ते म्हणाले.