कर्नाटकातील बेळगावमध्ये मराठी तरुणांनी काढलेल्या सायकल रॅलीवर कर्नाटक पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याचे वृत्त आहे. या घटनेचा महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच बेळगावमधील तरुणांनी हा काळा दिवस असल्याचे संबोधले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी बहुभाषिक बेळगावमध्ये वारंवार मराठी भाषिकांची गळचेपी केली जात आहे. भाषा, संस्कृती आणि मराठी कार्यक्रमांवरुन येथे नेहमीच पोलीस प्रशासनाची दडपशाही सुरु असते. त्याचेच ताजे उदाहरण आज मराठी तरुणांनी काढलेल्या रॅलीदरम्यान पहायला मिळाले आहे. केवळ मराठी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन सायकल रॅली काढल्याने कर्नाटक पोलिसांनी त्यांच्यावर अमानुषपणे लाठीमार केला. यामध्ये अनेक तरुण जखमी झाले आहेत.

या प्रकाराचा विविध राजकीय पक्षांनी निषेध नोंदवला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही एका वृत्तवाहिनीशी या घटनेसंदर्भात बोलताना तीव्र शब्दांत निषेध नोंदवत बेळगाव प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, यावर अंतिम उपाय म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि विविध पक्षाच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन या प्रश्नाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करायला हवी. तसेच केंद्रात महाराष्ट्रात आणि कर्नाटकात एकाच पक्षाचे सरकार अाल्यास हा प्रश्न सुटू शकतो, अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे.

त्याचबरोबर काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी देखील मराठी भाषकांवर झालेल्या लाठीमारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. विरोधी विचाराचे लोक जरी असले तरी त्यांच्यावर अशा पद्धतीने अन्याय, अत्याचार करणे गैर असल्याचे सांगत कर्नाटक पोलिसांनी केलेले हे कृत्य निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.