कानपूरमधील रेल बाजार पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी वेगळंच चित्र पहायला मिळालं. अनेकदा प्रेमी जोडपी घरातून पळून जात पोलीस स्टेशन गाठताना दिसतात. पण पोलीस कर्मचा-यांचं सूत जुळलं तर ? एकाच पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गिरीश यादव आणि कॉन्स्टेबल भावना तोमर यांच्यात प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा सहकाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आधी दोघेही न्यायालयात पोहोचले आणि तिथे कायदेशीर पद्धतीने विवाहबंधनात अडकले. यानंतर जेव्हा दोघे पोलीस ठाण्यात परतले तेव्हा सहका-यांनी फुलांचे हार मागवले आणि ठाण्यातच एकमेकांना हार घालायला सांगितलं. पोलीस निरीक्षक मनोज कुमार रघुवंशी यांच्यासहित सर्वांनीच त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याआधीही अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत, जिथे पोलीस ठाण्यातच प्रेमी युगुलाचं लग्न लावून देण्यात आलं. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील पोलिसांनी विनय कुमार आणि नेहा वर्मा यांचं पोलीस ठाण्यात लग्न लावून दिलं होतं. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण कुटुंबीय विरोधात होते. विनवण्या करुनही त्यांनी होकार दिला नाही म्हणून त्यांनी पळ काढला. कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पण दोघेही प्रौढ असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या लग्नाची व्यवस्था करुन दिली.