हल्ली मोबाइल म्हटला की त्याला Thumb lock हे फिचर असतेच. जवळपास बहुतांश स्मार्ट फोनमध्ये हे फिचर पाहायला मिळते. तुमच्या मोबाइलमधला डेटा, कॉन्टॅक्ट्स, मेसेजेस, फोटो हे सारे काही सुरक्षित रहावे म्हणून हे फिचर उपयोगात आणले जाते. मात्र माणूस मेल्यावर त्याचा अंगठा मोबाइलवर लावून मोबाइल अनलॉक करण्याचा प्रयत्न झाला तर? अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये असा एक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. लिनस फिलिप या ३० वर्षांच्या माणसाला पोलिसांनी चकमकीत ठार केले. त्याच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी दोन गुप्तहेर तिथे आले त्यांनी फिलिपच्या मृतदेहाचा अंगठा त्याच्या मोबाइलला लावून तो अनलॉक होतो का याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र त्याचा फोन अनलॉक झाला नाही.

लिनस फिलिपचा शोध पोलीस घेत होते. मात्र अधिकारी त्याच्यापर्यंत पोहचेपर्यंत त्याने कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याची पोलिसांसोबत चकमक झाली. या चकमकीत जो गोळीबार झाला त्याला लिनस फिलिप ठार झाला. लिनस फिलिपवर गोळीबारात काही लोकांना ठार केल्याचा आरोप होता. या प्रश्नी पोलीस त्याच्या शोधात होते. त्यानंतर त्याने जेव्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यात तो ठार झाला.

लिनसच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याआधी  दोन गुप्तहेर त्या ठिकाणी आले आणि लिनसच्या मृतदेहाच्या अंगठ्याच्या मदतीने या दोघांनीही त्याचा मोबाइल अनलॉक करण्याचा प्रयत्न केला. त्या स्मार्ट फोनमध्ये काही महत्त्वाची माहिती आहे का? कोणाच्या इशाऱ्यावरून तो हे सारे करत होता हे गुप्तहेरांना जाणून घ्यायचे होते. ‘द गार्डिअन’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. गुप्तहेरांची कृती अत्यंत अपमानजनक वाटली असे मत लिनसच्या प्रेयसीने म्हटले आहे. गुप्तहेरांनी केलेली कारवाई कायदेशीर आहे का? असा प्रश्न काही जणांनी विचारला आहे. मात्र फ्लोरिडात गुप्तहेरांनी केलेल्या या कृतीची चर्चा रंगली आहे.