चंडीगड-मोहाली सीमेवर पोलिसांनी उभारलेले संरक्षक कडे तोडून पंजाबच्या राज्यपालांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी शनिवारी पाण्याचा मारा केला.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सात महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यपालांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निवेदन सादर करण्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले होते त्यानंतर चंडीगडमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते.

पंजाब राज भवनाकडे जाण्यासाठी पंजाबच्या विविध भागांतून आलेले शेतकरी (महिलांसह) मोहालीतील अंब साहिब गुरुद्वाराजवळ जमले होते. त्याचप्रमाणे हरियाणाच्या विविध भागांमधून आलेले शेतकरी राज भवनकडे जाण्यासाठी पंचकुला येथील नदा साहिब गुरुद्वाराजवळ जमले होते. त्यामुळे चंडीगड-पंचकुला सीमेवर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था वाढविली होती.