काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छिंदवाड्यातील खासदार कमलनाथ यांच्यावर एका पोलिसाने बंदूक रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशमधील विमानतळावर हा प्रकार घडला असून याप्रकरणी संबंधित जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते कमलनाथ हे शुक्रवारी त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. दिल्लीत परतण्यासाठी कमलनाथ हे छिंदवाड्यातील विमानतळावर पोहोचले. विमानतळावर एका पोलिसाने कमलनाथ यांच्यावर बंदूक रोखली. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने त्या पोलीस शिपायाला ताब्यात घेतले. रत्नेश पवार असे या पोलिसाचे नाव असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आम्ही त्या पोलिसाचे निलंबन केले असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, अशी माहिती छिंदवाड्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीरज सोनी यांनी दिली. रत्नेश पवारचा रेकॉर्डही तपासला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. हा सर्व प्रकार घडला तेव्हा तिथे काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. त्याने कमलनाथ यांच्यावर बंदूक का रोखली, हे अद्याप समजू शकलेले नाही. कमलनाथ यांनी देखील या वृत्तावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.