सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ गुजरातमधील जुनागडचा असल्याचं सांगितलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक व्यक्ती भरचौकात सुमो कार बेदरकारपणे पळवत असल्याचं दिसत आहे. चालक ज्याप्रकारे कार चालवत आहे ते पाहून तिथे उपस्थित लोकही जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत आहेत. व्हिडीओत सुमो चालक दुचाकीवर असलेल्या दोघांना चिरडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दुचाकीवर असणारे दोघेही पोलीस कर्मचारी आहेत.

ओव्हरटेक करण्यासाठी हे पोलीस कर्मचारी सुमो चालकाला जागा देण्यास सांगत होते. चालक एका चौकात पोहोचल्यानंतर अचानक गाडी रिव्हर्स चालवण्यास सुरुवात करतो. नेमकं काय सुरु आहे हेच लोकांना कळत नाही. चालक बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचं पाहून रस्त्यावर चालणारे लोक जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु करतात.

ही सर्व घटना तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये सुमो ड्रायव्हर चौकात येताच गाडी रिव्हर्स घेतो आणि मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांना चिरडण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न तो दोनवेळा करतो. सुदैवाने पोलीस कर्मचाऱ्यांना काही होत नाही, मात्र त्यांची दुचाकी गाडीखाली येते. यानंतर चालक तेथून पळ काढतो.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक गुजरातच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.