News Flash

पंतप्रधानांच्या बैठकीवरून राजकीय वाद

केजरीवाल यांनी पंतप्रधान कार्यालयाला न सांगताच बैठकीतील घडामोडी प्रक्षेपित केल्यामुळे भाजपने आम आदमी पक्षावर शाब्दिक हल्लाबोल केला

संग्रहित (PTI)

देशातील प्राणवायूच्या अभूतपूर्व टंचाईवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी आयोजित केलेली मुख्यमंत्र्यांची बैठक राजकीय वादात सापडली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीचे ‘थेट प्रक्षेपण’ केल्यामुळे संतापलेल्या भाजपने केजरीवाल यांच्या ‘माफीनाम्या’ची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून ‘प्राणवायूच्या राजकारणा’वर प्रत्युत्तर दिले.

दिल्लीत प्राणवायूची मोठी टंचाई असून एखादी भयानक दुर्घटना झाली तर जबाबदार कोण? शेजारील राज्यांकडून प्राणवायूचे टँकर अडवले जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत केंद्रात कोणाशी संपर्क साधायचा? पंतप्रधान म्हणून तुम्ही मार्गदर्शन करा, असे बैठकीत केजरीवाल पंतप्रधानांना म्हणाले. बैठकीत केजरीवाल यांचे हे म्हणणे वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केले जात होते. केजरीवाल यांनी पंतप्रधान कार्यालयाला न सांगताच बैठकीतील घडामोडी प्रक्षेपित केल्यामुळे भाजपने आम आदमी पक्षावर शाब्दिक हल्लाबोल केला. केजरीवाल यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. मात्र, या बैठकीतील कोणतीही गोपनीय माहिती प्रसारित केली गेली नसल्याचा दावा केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाने केला. बैठकीचे थेट प्रक्षेपण न करण्याचे कोणतेही संकेत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री कार्यालयाने भाजपच्या आरोप फेटाळून लावले.

या बैठकीत केजरीवाल म्हणणे मांडत असताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांना अडवले. ‘परंपरा आणि शिष्टाचार न पाळता या खासगी बैठकीचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. एखाद्या मुख्यमंत्र्याकडून अशी बाब होणे योग्य नसून त्यांनी संयम पाळला पाहिजे’, अशा शब्दांत मोदींनी आक्षेप नोंदवला. त्यावर भविष्यात  या सूचनेचे पालन केले जाईल, असे सांगत केजरीवाल यांनी माफी मागितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:28 am

Web Title: political controversy over pm meeting abn 97
Next Stories
1 करोना लशीच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंधांचे अमेरिकेकडून समर्थन
2 तुर्कीतील क्रिप्टोकरन्सी दिवाळखोरीत!; थोडेक्स कंपनीचा संस्थापक देश सोडून फरार
3 “…तर राजकारणात मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श ठेवावा लागेल”
Just Now!
X