मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हे सरकार संकटात सापडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कमलनाथ आणि ज्योतीरादित्य सिंधिया यांच्यात वाद होतेच. आता या वादाला बंडखोरीची ठिणगी किती आणि कसं पेटवते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे १७ आमदार कर्नाटकात दाखल झाले आहेत. ते ज्योतिरादित्य सिंधिया यांची गटातील आहेत. विशेष बाब म्हणजे यामध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश आहे.

१७ आमदारांना बंगळुरुबाहेर असलेल्या एका रिसोर्टवर ठेवण्यात आलं आहे. राजवर्धन सिंह, बंकिम सिलावत, गिरीराज, रक्षा, जसवंत जाटव, सुरेश धाकड, जजपाल सिंह, बृजेंद्र यादव आणि पुरुषोत्तम पराशर अशी या आमदारांची नावं आहेत. ही बातमी समोर येताच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हेदेखील त्यांच्या भेटीला पोहचले आहेत. दरम्यान भाजपा सत्तेशिवाय राहू शकत नाही. १५ वर्षात मध्य प्रदेशात त्यांनी जो भ्रष्टाचार केला तो समोर येणार आहे त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत अशी टीका कमलनाथ यांनी केली.

दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नाराजीवर कमलनाथ यांनी मौन बाळगले आहे. आता ज्योतिरादित्य सिंधिया काय करणार? आणि मध्यप्रदेशात मिशन लोटस पाहायला मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.