कर्नाटकातील राजकीय नाट्याचा आज देखील समारोप न झाल्याने ते सुरूच राहणार असल्याचे दिसत आहे. विधानसभेचे कामाकाज सोमवार २२ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारने सायंकाळी सहा वाजेपर्यंत देखील बहुमत सिद्ध केले नाही.

तसेच मुख्यमंत्री कुमारस्वामींनी सोमावारी आपण विश्वास प्रस्तावावर उत्तर देणार असल्याचे सांगत, राज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार घेऊन कुमारस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.या अगोदर राज्यपाल वजूभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना दोनदा पत्र पाठवून आज सायंकाळ पर्यंत बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत दिली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत याबाबत राज्यपालांना अधिकार नसल्याचा युक्तीवाद केला होता.

बहुमत सिद्ध करण्याची मुदत काल संपल्यानंतर सर्वप्रथम आज दुपारी दीड वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. या कालवधीत देखील कर्नाटक सरकारकडून बहुमत सिद्ध केले गेले नव्हते. त्यानंतर राज्यपलांनी सायंकाळी सहा वाजेर्यंत वेळ वाढवली होती. मात्र तरी देखील बहुमत सिद्ध केले गेले नसल्याने कर्नाटकचे राजकीय नाट्य सुरूच राहणार असल्याचे दिसत आहे.

एकुण परिस्थिती पाहता आता राज्यपाल वजूभाई वाला हे केंद्र सरकारकडे व गृह मंत्रालयाकडे देखील येथील परिस्थितीबाबत पत्र पाठवणार असल्याची माहिती आहे.