बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा ते चटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. शिवाय दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवली आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पिक येणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सद्यस्थितीत नितीश कुमार यांनी बिहारचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तर त्यांना भाजपाचं मांडलिक व्हावं लागेल. नितीश कुमार यांच्या स्वभावाला ते साजेसं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा ते निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप होणं शक्य आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नितीशकुमारांनी माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत दगाफटका केला. राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि ते तर सत्तेत होते लालूप्रसाद यादव यांच्यासोबतही त्यांनी दगा केला. एनडीएलाही त्यांनी दगा दिला होता. त्यामुळे नितीशकुमार नेमकं काय करतील याची शाश्वती आत्ता तरी देता येत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

टीव्ही नाइन मराठीशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांना चिराग पासवान यांच्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की चिराग पासवान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते अमित शाह यांच्या शब्दाबाहेर असतील असं वाटत नाही. पासवान यांना आवर घालणं शक्य नव्हतं असं कोण म्हणेल? मोदी आणि शाह यांनी मनात आणलं असतं तर त्यांचं बंड मोडूनही काढलं असतं मात्र त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांचं किमान २० जागांवर तरी नुकसान केलं असंही संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याबद्दल विचारलं असता महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. नारायण राणेंनी ऑपरेशन लोटस होणार सांगितलं असलं तरीही महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे व्यवस्थित चालेल असा दावा संजय राऊत यांनी केला.