बोकाळलेला भ्रष्टाचार, चलनफुगवटा आणि बेरोजगारीमुळे देशात राजकीय अस्थैर्य असल्याने लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होतील, असे भाकीत बसपाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पुढील निवडणुकीत पक्षाला उत्तम कामगिरी करता येणे शक्य व्हावे यासाठी तयार राहण्याचे आवाहनही मायावती यांनी कार्यकर्त्यांना केले.
यूपीएच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार, चलनफुगवटा आणि बेरोजगारी वाढली असल्याने देशात राजकीय अस्थैर्य आहे त्यामुळेच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होतील, असे मायावती यांनी येथे पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सांगितले.
उत्तर प्रदेशातील सपाचे सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले असून कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिकट झाली आहे. इतकेच नव्हे तर विकासकामेही ठप्प झाली आहेत. त्यामुळे जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत, असेही त्या म्हणाल्या. सपाला जनतेची काळजी नाही तर स्वत:चीच काळजी आहे आणि त्यामुळे भविष्यात जनतेकडूनच त्यांना शिक्षा मिळेल, असेही त्या म्हणाल्या.