राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्याचा आरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर टीका करणे या कृत्यामागे राजकीय कट असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह बौद्धिक प्रमुख जे. नंदकुमार यांनी केला.

न्यायाधीशांनी जे काही केले ते माफ करण्यापलीकडे आहे कारण त्यातून लोकांच्या न्यायव्यवस्थेवर असलेल्या अढळ विश्वासावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असे नंदकुमार यांनी म्हटले. नंदकुमार यांनी १३ जानेवारी रोजी फेसबुकवर जाहीर केलेल्या पोस्टमध्ये हे मत मांडले आहे. त्यातून त्यांनी या न्यायाधीशांनी वातावरण कलुषित केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली आहे.

सरन्यायाधीशांनी १९८४ सालच्या शीखविरोधी दंगलींच्या खटल्याची नव्याने सुनावणी करण्याचे आदेश दिल्यानंतर लगेचच त्यांच्यावर जाहीर आरोप होऊ लागले. अयोध्या येथील वादग्रस्त जमीन मालकी खटल्याची सुनावणी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत लांबवण्याची मागणी केल्याबद्दल सरन्यायाधीशांनी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांना धारेवर धरले. या घटनांबरोबरच डावे नेते डी. राजा यांनी या चार बंडखोर न्यायाधीशांपैकी एकाच्या निवासस्थानी नुकतीच भेट दिली. या सर्व घटनांची वेळ सूचक आहे. त्यातून या प्रकरणी मोठा राजकीय कट शिजत असल्याचा आरोप नंदकुमार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना केला.