एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांमध्ये कामाबद्दलच्या बांधिलकीचा अभाव जाणवतो, असे विधान काही दिवसांपूर्वी नागरी उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी केले होते. राजू यांच्या या विधानाचा एअर इंडियाच्या एका वरिष्ठ वैमानिकाने चांगलाच समाचार घेतला. राजकीय नेत्यांची देशाबद्दलची बांधिलकी किती आहे, असा सवाल एअर इंडियाच्या वैमानिकाने उपस्थित केला आहे.

‘प्रेरणेची कमतरता आहे, बांधिलकीची नाही’, या शीर्षकाखाली लिहिलेल्या पत्रात एअर इंडियाच्या वरिष्ठ वैमानिकाने सर्वच राजकारण्यांवर आणि विशेषत: सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ‘एअर इंडियाचा एक बांधिलकी जपणारा कर्मचारी म्हणून, एक प्रामाणिक करदाता म्हणून आणि एक देशप्रेमी नागरिक म्हणून मी तुमचे लक्ष संसदेच्या कामाकाजाकडे वेधू इच्छितो. नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमधील कामकाजाचा वेळ वाया गेला. तुमच्या सहकाऱ्यांनी संसदेचे कामकाजच होऊ दिले नाही. लोकसभेचे तब्बल ९२ तास कामकाज होऊ शकले नाही,’ अशा शब्दांमध्ये एअर इंडियाच्या वैमानिकाने अशोक गजपती राजू यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

अशोक गजपती राजू यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दलच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एअर इंडियाच्या वैमानिकाने गजपती राजू यांच्या या टिकेचा जोरदार समाचार घेतला आहे. ‘आमचे राजकारणी त्यांची देशाविषयीची बांधिलकी जपण्यात कमी पडताना दिसत आहेत. जगातील नेत्यांचा विचार केल्यास आमचे राजकारणी बांधिलकी जपण्यात खूपच मागे आहेत,’ असेदेखील वैमानिकाने पत्रात म्हटले आहे.

अशोक गजपती यांना पत्राच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर देणारा वैमानिक एअर इंडियाचे बोईंग ७७७ हे विमान चालवतो. ‘ज्या पद्धतीने खासदार संसदेत वागतात, तसे एखादा एअर इंडियाचा कर्मचारी वागला असता, तर त्याला कडक शब्दांमध्ये ताकीद देण्यात आली असती,’ असे या वैमानिकाने त्याच्या पत्रात म्हटले आहे.

‘देशातील राजकारणी आत्मपरिक्षण करुन स्वत:मध्ये बदल करतील. त्यातून इतरांसमोर आदर्श ठेवतील, अशी देशाचा एक नागरिक आणि राष्ट्रीय विमान कंपनीचा कर्मचारी म्हणून मला आशा आहे,’ असे एअर इंडियाच्या वैमानिकाने पत्रात म्हटले आहे. ‘ज्या पद्धतीची प्रेरणा आम्हाला मिळते, त्यानुसार आम्ही दाखवत असलेली बांधिलकी पुरेशी आहे,’ असेदेखील एअर इंडियाच्या वैमानिकाने सुनावले आहे.

तीन दिवसांपूर्वी एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना नागरी उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांमध्ये कामाबद्दलच्या बांधिलकीचा अभाव दिसून येतो, असे म्हटले होते. खासगी विमान कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एअर इंडियाचे कर्मचारी कामाच्या बाबतीत कमी पडत असल्याचे राजू यांनी म्हटले होते.