नॅशनल हेराल्ड प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाकडून १०० टक्के सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. मात्र, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचेही बुधवारी संसदेच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष संसदेत गोंधळ घालून न्यायव्यवस्थेवर दबाव आणत असल्याचा विरोधकांचा आरोप यावेळी राहुल यांनी फेटाळत परिस्थिती अगदी उलट असल्याचं ते म्हणाले. यावेळी संसदेवर दबाब आणण्यासाठी सत्ताधा-याकडून न्यायव्यवस्थेचा वापर केला जात आहे. न्यायव्यवस्थेवर कोण दबाव आणत आहे, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, असंही राहुल यांनी सांगितले.
या सगळ्यात १०० टक्के राजकीय सुडाची भावना आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून शुद्ध सुडाचे राजकारण सुरू आहे. हीच त्यांची राजकारण करण्याची पद्धत असल्याचे राहुल यांनी सांगितले. मात्र, आम्हाला न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. अंतिम सत्य लवकरच बाहेर येईल, असे राहुल यांनी म्हटले.