नवाझ शरीफ यांच्या पक्षाला पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेची संधी मिळत असली तरी त्यांचा प्रवास बिकट आणि निसरडय़ा वाटेवरूनच होण्याची शक्यता आहे, असे भाकीत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. या निवडणुकीत त्यांची सरशी झाल्याने भविष्यात त्यांना स्वतचा अजेंडा राबविण्याचे स्वातंत्र्य मिळेल. मात्र त्याचवेळी त्यांच्या सरकारसमोरील आव्हानेही मोठी असतील, असे मत ‘मूडीज’ या जागतिक रेटिंग एजन्सीने व्यक्त केले आहे.
पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) हा पक्ष पुढे सरसावला आहे. या पक्षाने १२२ जागांवर विजय मिळविल्याने अपक्षांच्या साहाय्याने सत्ता स्थापन करणे त्यांना शक्य होणार आहे. हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याने शरीफ यांना आपली ध्येयधोरणे खुलेपणाने राबविता येतील, असे ‘मूडीज’ने म्हटले आहे. या सरकारमध्ये घटक पक्षांना फारसा वाव नसल्याने शरीफ यांना मोकळेपणे राजकारण करता येईल, त्याचा लाभ त्यांच्या पक्षाला व पाकिस्तानलाही होऊ शकेल. मात्र त्यांच्यासमोरील आव्हानेही लहानसहान नाहीत, आधीच्या सरकारला ही आव्हाने पेलणे शक्य झाले नव्हते, असे निरीक्षणही यात नोंदविले आहे.  
पाकिस्तानची आर्थिक मदार अमेरिकेवर असून अमेरिकेसोबतचे द्विपक्षीय करार सुरू ठेवण्यासाठी शरीफ यांना बरीच शक्ती खर्ची करावी लागेल. अमेरिकेने गेल्या वर्षी पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या अर्थपुरवठय़ात काही प्रमाणात कपात केली असल्याने शरीफ यांना त्याचे पुनरुज्जीवन करावे लागेल. अमेरिकेचा विश्वास संपादन करण्यासाठी शरीफ यांची मुत्सद्देगिरी पणाला लागेल. भारताबाबतची त्यांची भूमिका कशी असेल यावरही त्यांचे यश अवलंबून असेल, तसेच पाकिस्तानमध्ये बऱ्याच प्रमाणात अंतर्गत सुधारणा करण्याची आवश्यकता असून ती साफसफाई करण्याचेही मोठे आव्हान शरीफ यांच्यासमोर आहे, असे निरीक्षण यात नोंदविण्यात आले आहे.
शाहबाज शरीफ पंजाबचे चौथ्यांदा मुख्यमंत्री?
पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून शाहबाज शरीफ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पीएमएल-एन पक्षाने घेतला आहे. त्यापूर्वी त्यांची फेडरल सरकारमध्ये वर्णी लावण्याचा विचार करण्यात आला होता. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा शहाबाज यांचा विक्रम आहे. शहाबाज शरीफ यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत विकासाच्या अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या होत्या. मेट्रो बस ही त्यापैकीच एक योजना असून त्याचा लाभ दररोज एक लाखाहून अधिक प्रवाशांना होत आहे. पीएमएल-एन पक्षाने पंजाब प्रांतात २९७ पैकी २१२ जागा थेट पटकाविल्या आहेत. त्यामुळे राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या या प्रांतात पक्षाचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पंजाबमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि इम्रान खान यांची तेहरिक-ए-इन्साफ पार्टी हे कमकुवत विरोधी पक्ष आहेत. पाकिस्तानमधील विजेच्या स्थितीवर मात करण्यासाठी शाहबाज शरीफ यांना फेडरल सरकारमध्ये ऊर्जामंत्रीपद देण्याचे संकेत यापूर्वी पक्षातील काही नेत्यांनी दिले होते.