आश्वासनाची ‘साथ’ बिहारमधून अमेरिकेकडे..

नवी दिल्ली : करोना विषाणू साथीचा उच्छाद कायम असताना आणि त्यावरील लस अद्याप प्रयोगप्रक्रियेत असताना भारत असो वा अमेरिका निवडणुकीत मतदारांना मोफत लस देण्याचे आश्वासन ‘लस’कारणास कारणीभूत ठरले आहे.

भाजपच्या मोफत लशीच्या आश्वासनावर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, ‘‘मोफत लशीवर सर्वाचाच हक्क आहे, सर्वाना ती मोफत द्यावी’’, अशी टिप्पणी शनिवारी केली. तर गेल्या वर्षांपर्यंत भाजपप्रणीत ‘रालोआ’चा घटक पक्ष असलेल्या आणि आता महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने, ‘‘भाजपने मोफत लशीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत. बिहारला लस मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये पाकिस्तानात नाहीत. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लशीची गरज आहे’’, असे भाष्य केले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही गुरुवारी मोफत लशीच्या आश्वासनाचा उपहास केला होता. ‘‘अन्य खोटय़ा आश्वासनांबरोबरच मोफत लशीचे आश्वासन आपल्याला केव्हा मिळेल, हे जाणण्यासाठी राज्यांमधील निवडणुकांचे वेळापत्रक तपासून पाहा’’, असे ट्वीट राहुल यांनी केले होते.

लशीच्या आश्वासनावर टीकेचा मारा सुरू असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे आश्वासन नियमानुसार योग्यच असल्याचे समर्थन शनिवारी केले. त्याचवेळी तिकडे अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पार्टीचे उमेदवार ज्यो बायडेन यांनीही ‘‘आपण अध्यक्षपदी निवडून आल्यास सर्व अमेरिकी नागरिकांना करोना लस मोफत देऊ’’, असे आश्वासन दिले आणि ‘रालोआ’च्या बिहार जाहीरनाम्याशी बरोबरी साधली.

बिहार निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) तेथील मतदारांना मोफत करोना लस देण्याचे आश्वासन गुरुवारी प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात दिले आहे. देशभर करोनाची साथ असताना बिहारला ती मोफत देण्याच्या भाजपच्या आश्वासनावर देशभर टीका-टिप्पण्यांचा आणि उपहास-उपरोधाचा भडिमार अजूनही सुरू आहे.

मोफत करोना लशीच्या भाजपच्या आश्वासनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, ‘‘देशातील सर्वच लोकांना करोनाचा धोका आहे, त्यामुळे मोफत लशीवर सर्वाचाच हक्क आहे, सर्वाना ती मोफत द्यावी’’ अशी मागणी शनिवारी एका कार्यक्रमात केली.

भाजपच्या मोफत लशीच्या आश्वासनावर महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही भाष्य केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात भाजपच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे. ‘‘भाजपने मोफत लशीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत. बिहारला लस मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. करोना लसीचा मुद्दा भाजपच्या बिहारी घोषणापत्रात यावा, हे योग्य नाही. लशीचे वितरण सरकारची आणि राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एक प्रकारे भेदाभेदीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लशीची गरज आहे’’, असे भाष्य ‘सामना’च्या अग्रलेखात करण्यात आले आहे.

समाज माध्यमांवरही भाजपच्या आश्वासनावर उपहास आणि उपरोधिक मिम्सचा महापूर सुरूच आहे. ‘‘मोफत लस हवी असेल तर बिहारमध्ये जा’’, इथपासून ‘‘जी लस जगात तयारच झाली नाही, ती मोफत देण्याचे आश्वासन? कमालच आहे’’, इथपर्यंतच्या उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

वचन नियमानुसारच – सीतारामन

मोफत लशीच्या आश्वासनाने कुठल्याही निकषांचे किंवा नियमांचे उल्लंघन झालेले नाही. सत्तेवर आल्यानंतर काय करू, हे सांगण्याचा अधिकार कुठल्याही पक्षाला आहे. हे आश्वासन ही निवडणूक जाहीरनाम्यातील घोषणा आहे. आरोग्य हा राज्यसूचीतील विषय असला तरी आमची घोषणा नियमात बसणारी आहे, असे समर्थन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.

लस सर्वानाच मोफत द्या – केजरीवाल

करोना लस देशातील सर्वच लोकांना मोफत उपलब्ध करावी. संपूर्ण देशाचा तो हक्क आहे. कारण करोनाचा धोका सर्वानाच आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.

अमेरिकेत बायडेन यांचीही मोफत लसहामी

सुरक्षित आणि प्रभावी लस तयार झाल्यानंतर सर्व जण करोनातून मुक्त होतील. मी निवडून आलो तर मोठय़ा प्रमाणात लस खरेदीचे आदेश देईन आणि विमा नसलेल्यांनाही लस मोफत दिली जाईल, असे आश्वासन अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी दिले.