कर्नाटक सरकारने आपल्या राज्याच्या वेगळ्या झेंड्याला गुरुवारी परवानगी दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या झेंड्याचे डिझाईन मंत्रीमंडळाकडून मंजूर करुन घेऊन केंद्र सरकारकडे ते मंजूरीसाठी पाठवले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्धरामय्या यांच्या या डावपेचामुळे कर्नाटकमधील राजकारण तापले आहे.


कर्नाटकमध्ये भाजपाच्यावतीने मुख्यमंत्रीपदासाठीचे उमेदवार असलेले बी. एस. येडियुरप्पा म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरुन आपला राजीनामा द्यायला हवा. या प्रकरणाहून राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आपण करणार आहोत. सरकारचे चार वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्यांना राज्याचा वेगळ्या झेंड्याला मंजूरी देण्याचे कसे काय सुचले, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांना जर असे करायचेच होते तर त्यांनी ते यापूर्वीच करायला हवे होते, असेही येडियुरप्पा म्हणाले.

लाल, पांढरा आणि पिवळ्या रंगाच्या या आयताकार झेंड्याला ‘नाद झेंडा’ असे नाव देण्यात आले आहे. या झेंड्याच्या मधोमध राज्याचे प्रतिक असलेला दोन डोक्यांचा पौराणिक पक्षी ‘गंधा भेरुण्डा’ याचे चित्र आहे. यावरुन सिद्धरामय्या यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कन्नड अस्मितेचे राजकारण केल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला आहे. मात्र, केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतरच कर्नाटकच्या या झेंड्याला अधिकृत मान्यता मिळणार आहे.